फलटण तालुक्यातील मुदत संपलेल्या ८० ग्रामपंचायतींची प्रारूप वॉर्ड रचना जाहीर; १३ एप्रिलपर्यंत हरकती नोंदविण्याचे आवाहन


फलटण तालुक्यातील फेब्रुवारी महिन्यात मुदत संपलेल्या ८० ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग (वॉर्ड) रचना प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांना १३ एप्रिलपर्यंत तहसील कार्यालयात आपल्या हरकती नोंदवता येतील.

स्थैर्य, फलटण, दि. ८ एप्रिल : फलटण तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी महिन्यामध्ये संपलेली आहे, त्यांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. या मुदत संपलेल्या एकूण ८० ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग (वॉर्ड) रचना प्रशासनाकडून अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली आहे.

चावडी आणि ग्रामपंचायत कार्यालयात याद्या प्रसिद्ध:

तहसीलदार डॉ. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील या ८० ग्रामपंचायतींची वॉर्ड रचना आज संबंधित गावांच्या ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये तसेच गावातील चावडीवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. गावपातळीवर ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) आणि ग्रामविकास अधिकारी (ग्रामसेवक) यांच्याकडून ही प्रारूप वॉर्ड रचना नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना आपल्या वॉर्डाची नव्याने झालेली रचना आता पाहता येणार आहे.

हरकती नोंदवण्यासाठी १३ एप्रिलपर्यंतची मुदत:

जाहीर करण्यात आलेल्या या प्रारूप वॉर्ड रचनेबाबत गावातील कोणत्याही नागरिकाच्या काही हरकती किंवा सूचना असतील, तर प्रशासनाकडून त्या नोंदवण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. संबंधित नागरिकांनी शासकीय सुटीचे दिवस वगळून येत्या १३ एप्रिलपर्यंत आपल्या हरकती फलटण तहसील कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत लेखी स्वरूपात नोंदवाव्यात, असे आवाहन तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्याकडून करण्यात आले आहे.

आगामी निवडणुकांच्या दृष्टीने ही वॉर्ड रचना अत्यंत महत्त्वाची असल्याने, आता ग्रामीण भागातील राजकीय आखाडे बांधण्याला आणि राजकीय हालचालींना मोठा वेग येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!