स्थैर्य, फलटण, दि.१९ : येथील डॉ. सुमेध मगर यांना मास्टर या वैद्यकिय क्षेत्रातील पद्वीसाठी युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथे क्रिडा, वैद्यक, व्यायाम व आरोग्य या विशेष अभ्यास शाखेत प्रवेश मिळाला असून या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
सदरचे वैद्यकिय विद्यापीठ जगातील एक सर्वोत्तम विद्यापीठ समजले जात असून जागतिक वैद्यकिय विद्यापीठामध्ये या विद्यापीठास 8 वी श्रेणी प्राप्त आहे. इंग्लंडमध्ये वैद्यकिय क्षेत्र व वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील हे प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ आहे. या विद्यापीठाने आजपर्यंत 29 नोबेल पुरस्कार प्राप्त विद्यार्थी जगास दिले आहेत.
जगातील अशा नामांकित वैद्यकिय शिक्षण संस्थेमध्ये आरोग्य शास्त्रातील उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळणे हा मोठा बहुमान व सन्मान आहे. डॉ. सुमेध मगर हे सैनिक स्कूल साताराचे माजी विद्यार्थी असून उत्कृष्ट क्रिडापटू आहेत. शालेय जीवनात त्यांनी अनेक सुवर्ण व रौप्य पदके प्राप्त केली आहेत. राष्ट्रीय जलतरण पटू असा किताबही त्यांनी प्राप्त केले आहे.
अखिल भारतीय वैद्यकशास्त्र संस्था, नवीदिल्ली येथे आयोजित अंतरवैद्यकिय स्पर्धेत डॉ. सुमेध मगर यांनी सुवर्ण व रौप्य पदक प्राप्त केले आहे. त्यांनी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, कोल्हापूर येथे एम.बी.बी.एस. व डॉ. डी.वाय.पाटील कॉलेज पुणे येथे एम.एस. (आर्थो) यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. महाराष्ट्र अस्थीविकार संघटनेच्यावतीने दिला जाणारा पद्मश्री वेदसिंह मारवाह संशोधन पारितोषिकाने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
तरुणांनी व्यवसाय कौशल्य अवगत करुन योग्य व्यवसाय निवडल्यास उज्वल यश : उद्योजक राम निंबाळकर
डॉ. सुमेध मगर हे पश्चिम महाराष्ट्रातील आर्थोस्कोपी व आर्थोप्लास्टी या क्षेत्रातील प्रख्यात डॉ. हेमंत मगर आणि लॅप्रोस्कॉपी शल्यविशारद डॉ. सौ. मीरा मगर यांचे सुपूत्र आहेत. सुश्रृत हॉस्पिटल, फलटण आणि जॉईंट अॅण्ड स्पाईन क्लिनिक बारामती तसेच बारामती क्रिडा संघटना यांचेवतीने डॉ. सुमेध मगर यांना उज्वल यश क्रिडा वैद्यक शाखेतील अभ्यासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या क्षेत्रातील डॉ. सुमेध मगर यांचे ज्ञान व कौशल्याचा उपयोग राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिडापटू घडविण्यासाठी होणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.