डॉ. शशि डोईफोडेंनी आरोपीचा पुरवला पिच्छा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि ८: दुष्काळी भागातील असूनही ज्यांनी सिनेसृष्टीत प्रवेश करुन मोठय़ा परिश्रमातून निर्माता, दिग्दर्शक म्हणून नावलौकिक मिळवला. मात्र 2017 मध्ये त्यांची एका युवकाने बनावट फेसबुक अकाऊंट ओपन करुन निर्मात्यांची बदनामी करणाऱया पोस्ट टाकल्या. यामुळे त्या निर्मात्यांना प्रचंड मानसिक, आर्थिक त्रास सहन करावा लागला. त्यांची तक्रारही घेतली जात नव्हती. मात्र, निर्माता डॉ. शशिकांत डोईफोडे यांनी गेल्या तीन वर्षांपासून त्यांना न्याय मिळावा म्हणून पिच्छा पुरवला आणि अखेर 6 फेब्रुवारी 2020 रोजी गुन्हा दाखल झाला. पण म्हसवड पोलिसांकडून आरोपी आकाशनंद जाधव यास अटक करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे डॉ. डोईफोडे सांगितले.
2017 च्या दरम्यान डॉ. शशिकांत डोईफोडे त्यांच्या ग्रेड माय इंडिया चित्रपटाच्या निर्मितीत व्यस्त होते. मात्र, त्यांना जानेवारी 2017 मध्ये अचानक अनोळखी लोकांचे फोन येवू लागले. कॉलगर्ल मिळेल, शरीर सुखाची सोय होईल अशी विचारणा त्यांना होत होती. डॉ. डोईफोडे हैराण झाले. हे असे का घडतेय याचा शोध घेताना त्यांना लक्षात आले की दादा राठोड नावाने कोणीतरी फेसबुक अकौंटवर त्यांच्या चित्रपटाच्या शुटींगमधील फोटोंचा गैरवापर करुन अश्लिल फोटो टाकले आहेत. त्या फोटोखाली डॉ. डोईफोडे यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे.
तोपर्यंत या प्रकारामुळे डॉ. डोईफोडे प्रचंड हैराण झाले होते. त्यांची समाजात बदनामी होवू लागली होती. त्यांच्या घरच्यांसह त्यांचेही मानसिक संतुलन बिघडले होते. त्यांनी फेसबुकशी संपर्क साधून तक्रार नोंदवल्यानंतर फेसबुक अकौंट बंद झाले. मात्र तोपर्यंत त्यांचा दहावीत शिकणारा मुलगा, त्यांची पत्नी यांच्यावर त्याचा विपरित परिणाम झाला होता. फेसबुक अकौंट बंद झाल्यानंतरही त्यांना फोन येणे सुरुच होते. या फेसबुक अकौंटवर बदनामी झाल्याने त्यांच्या हातातून सिनेमाची कामेही गेली व त्यांना आर्थिक फटकाही बसला.
त्यांनतर पुन्हा हे बंद झालेले अकौंट सुरु झाले. त्यांना फोन वाढले. पुन्हा त्यांनी फेसबुककडे तक्रार केली. मात्र फेसबुकने अकौंट बंद केले नव्हते. शेवटी त्यांनी 2019 मध्ये सातारा सायबर क्राईम ब्रँचला मेल करुन दादा राठोड नावाच्या फेसबुक अकौंटबाबत तक्रार नोंदवली. तोपर्यंत त्यांना येणाऱया फोनमुळे त्यांचे जीवन उध्दवस्त होण्याची वेळ आली होती. जुलै 2020 मध्ये त्यांना सायबर क्राईम ब्रँचमधून फोन आला की फेसबुक अकौंटवर दादा राठोड नावाने फेक अकौंट काढून त्यांची बदनामी करणारी व्यक्ती सापडली आहे.
आकाशनंद अजितानंद जाधव रा. दहिवडी असे त्या व्यक्तीचे नाव होते. वास्तविक या व्यक्तीने असे का केले हे डॉ. डोईफोडे यांना समजले नाही. त्यांना जबाब देण्यासाठी सातारा सायबर क्राईम ब्रँचने बोलावून घेतले. मात्र, कोरोना स्थितीमुळे ते जावू शकले नव्हते. त्यांनी माझा जबाब सातारा ऐवजी म्हसवड पोलीस ठाण्यात घेण्याबाबत मेलवरुन विनंती केली होती.
त्यानंतर अखेर दि. 6 फेब्रुवारी रोजी डॉ. शशिकांत डोईफोडे यांनी आकाशनंद जाधव याच्या विरुध्द त्याने बनावट फेसबुक अकौंट काढून व अनोळखी महिलेशी त्यांचे फोटो जोडून अश्लिल स्वरुपात ते टाकले. त्याच्या खाली त्यांचा मोबाईल टाकल्याने त्यांची बदनामी, आर्थिक नुकसान, मानसिक त्रास झाल्याची तक्रार दिली. त्यावरुन आकाशनंद जाधव याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपीला अटक करण्यास टाळाटाळ
आकाशनंद जाधव हा दहिवडीतील सदन कुटुंबातील असून त्याच्याबाबत डॉ. डोईफोडे यांनी तक्रार दिली. सर्व पुरावे समोर आहेत. सायबर क्राईमला हा विषय माहिती आहे. मात्र, म्हसवड पोलीस ठाण्याकडून गुन्हा दाखल होवून जाधव याला अटक करण्यास टाळाटाळ केली जात आहे. तीन वर्षे प्रचंड त्रास सहन केला. गुन्हेगाराचा पिच्छा पुरवला पण म्हसवड पोलिसांकडून टाळाटाळ का होत आहे असा सवाल डॉ. डोईफेडे यांना पडलाय.
विकृताचा झाला खेळ पण सजा डोईफोडेंना
फेसबुक हे माध्यम चांगलेही अन वाईटही. त्याचा चुकीचा वापर करुन जाधव याने विकृती दाखवली. मात्र डॉ. डोईफोडे व त्यांच्या कुटुंबियांना त्याच्या विकृतीने प्रचंड मानसिक त्रास झाला. आर्थिक नुकसान झाले. बदनामी सहन करावी लागली. मात्र, डॉ. डोईफोडे यातून सावरत गेले आणि त्यांनी तीन वर्षे प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत त्यांची बदनामी करणाऱया गुन्हेगाराचा पिच्छा पुरवला. सायबर क्राईमने त्यांना साथ दिली. पण खरं तर विकृताचा खेळ झाला पण सजा डोईफेडे यांनी भोगली असून त्यांना पोलिसांनी न्याय देण्याची गरज आहे.


Back to top button
Don`t copy text!