आयआयटी दिल्ली येथील गणिताचे प्राध्यापक डॉ.राजेंद्र कुमार शर्मा यांची गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.२४: दिल्ली आयआयटी येथे दीर्घकाळ गणिताचे प्राध्यापक असलेले तसेच सध्या स्वित्झर्लंड येथे संशोधन अध्यासन पद धारण करीत असलेल्या डॉ.राजेंद्र कुमार शर्मा यांची गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी डॉ.राजेंद्र कुमार शर्मा यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

दि.७ सप्टेंबर २०२० रोजी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नामदेव कल्याणकर यांचा कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिक्त होते. रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रो.श्रीनिवास वरखेडी यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

डॉ.राजेंद्र कुमार शर्मा (जन्म २० नोव्हेंबर १९५८) यांनी मेरठ विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून आयआयटी दिल्ली येथून पीएच.डी. प्राप्त केली आहे. त्यांनी फ्रान्स व जर्मनी येथे पोस्ट डॉक्टरल शिक्षण प्राप्त केले आहे. डॉ.शर्मा यांनी आयआयटी खडकपूर येथे अध्यापनाला सुरुवात केली व सन २००२ पासून ते दिल्ली आयआयटी येथे प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत.

दि. १ जानेवारी २०१९ रोजी त्यांची स्वित्झर्लंड येथे कन्सेनसिस ब्लॉकचेन या संशोधन अध्यासनावर नियुक्ती करण्यात आली. त्यांना अध्यापनाचा ३२ वर्षांचा अनुभव असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ३२ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. केली आहे.

कुलगुरू निवडीसाठी राज्यपालांनी पाटणा व दिल्ली उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती राजेंद्र मेनन यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सोशल एण्ड इकोनॉमिक चेंज, बंगलोर येथील संचालक डॉ.एस माधेश्वरन व शासनाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर या समितीचे सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ.राजेंद्र कुमार शर्मा यांची कुलगुरूपदी नियुक्ती जाहीर केली. (डॉ.राजेंद्र कुमार शर्मा, ०९०१३६४३१०६)


Back to top button
Don`t copy text!