“डॉ. प्रसाद जोशी यांनी मंगेशकर हॉस्पिटलला सल्ला द्यावा” – ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर; ‘उषा-वैभव पुरस्कार’ वितरण व जोशी हॉस्पिटलचा रौप्यमहोत्सवी सोहळा दिमाखात संपन्न


जोशी हॉस्पिटलच्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त डॉ. प्रसाद जोशी यांना ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते ‘उषा-वैभव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी ‘डॉ. जोशी यांनी मंगेशकर हॉस्पिटलला येऊन सल्ला द्यावा,’ असे गौरवोद्गार उषाताईंनी काढले.

स्थैर्य, फलटण, दि. 6 एप्रिल : “हॉस्पिटलमध्ये रोगी येणे यापेक्षा आलेला रोगी बरा होणे अधिक महत्त्वाचे असते. डॉ. प्रसाद जोशी यांनी पुण्याच्या मंगेशकर हॉस्पिटलमध्ये येऊन सल्ला द्यावा,” अशी सार्थ अपेक्षा भारताच्या ज्येष्ठ पार्श्वगायिका उषाताई मंगेशकर यांनी व्यक्त केली.

फलटण येथील वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित ‘जोशी हॉस्पिटल प्रा. लि.’ च्या रौप्यमहोत्सवी (२५ वर्षे) वर्षपूर्तीनिमित्त आयोजित भव्य सोहळ्यात यावर्षीचा प्रतिष्ठेचा ‘उषा-वैभव पुरस्कार’ ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. प्रसाद जोशी यांना उषाताई मंगेशकर यांच्या शुभहस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. तसेच, उषाताईंनी आपण यापूर्वीही फलटणला येऊन गेलो असल्याची आठवण सांगत, पुन्हा एकदा येथे येण्याची इच्छा व्यक्त केली.

या भव्य सोहळ्यास राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात सुरुवात झाली.

तसेच, या कार्यक्रमास विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, ज्येष्ठ अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यासह ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील, सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे शिल्पकार दिलीपसिंह भोसले, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ, स्वयंसिद्धा महिला उद्योग समूहाच्या संस्थापिका सौ. मधुबाला भोसले, सद्गुरू पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, फलटणच्या उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले आणि श्रीराम शिक्षण संस्थेचे मानद सचिव सचिन सूर्यवंशी-बेडके आदी मान्यवर उपस्थित होते.

‘जिंदगी प्यार का गीत है…’ – पद्मिनी कोल्हापुरे

यावेळी बोलताना ज्येष्ठ अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनीही आपण पूर्वी फलटणला येऊन गेल्याची आठवण सांगितली आणि आपले फलटणशी एक वेगळे नाते जुळले असल्याचे त्या म्हणाल्या. डॉ. प्रसाद जोशी यांच्या वैद्यकीय योगदानाबद्दल बोलताना त्यांनी ‘जिंदगी प्यार का गीत है…’ या प्रसिद्ध गाण्याच्या ओळी गाऊन उपस्थितांची मने जिंकली.

श्रीमंत रामराजेंकडून संगीत परंपरेला उजाळा

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या मनोगतातून फलटणच्या समृद्ध संगीत परंपरेचा आणि वारशाचा उल्लेख करताना ‘औंधच्या संगीत महोत्सवाची’ आठवण उपस्थितांना करून दिली. तसेच, त्यांनी यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी राजकारणात प्रवेश करावा, अशी अपेक्षाही मिश्किलपणे व्यक्त केली.

या शानदार कार्यक्रमाचे प्रास्ताविक बकुळ पराडकर यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी प्राचार्य रवींद्र येवले यांनी अत्यंत खुमासदार शैलीत केले.

‘मॅजिकल आरडी’ने जिंकली मने

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर सौरभ दप्तरदार आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या सांगीतिक कार्यक्रमाने संपूर्ण मैफील रंगतदार झाली. या कार्यक्रमातून सुप्रसिद्ध संगीतकार आर. डी. बर्मन यांच्या अजरामर गाण्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!