डॉ. पिंजारी यांच्यामुळे माणच्या शिरपेचात मानाचा तुरा
स्थैर्य, म्हसवड दि. १९ : माण तालुका बुध्दीवंताची खाण असल्याचे यापुर्वीच माणच्या अनेक भुमीपुत्रांनी दाखवुन देत आपल्या बुध्दीच्या जोरावर माणचे नाव देशाच्या नकाशावर कोरले आहे पुन्हा एकदा माणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याचे काम म्हसवड येथील डॉ. दिपक पिंजारी यांनी केले आहे. माणदेशाचे नाव जागतिक पातळीवर घेऊन जाणारे शास्त्रज्ञ डॉ. दिपक विठ्ठल पिंजारी यांना राष्ट्रीय विज्ञान अकादमी यांचे सभासदत्व मिळाले असून हा पुरस्कार मिळणारे ते या वर्षीचे ३ महाराष्ट्रीयन पैकी ते एक आहेत.
राष्ट्रीय विज्ञान अकादमी हि भारतामधील पहिली अकादमी असून त्याची स्थापना १९३० साली झाली आहे. ह्या अकादमीच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयाचे शात्रज्ञ एकत्र येऊन विज्ञान विचारांचे देश पातळीवर एकत्र येऊन नवनवीन क्षेत्रात संशोधन करणे, नवनवीन समाजपयोगी तंत्रज्ञान निर्माण करणे, इत्यादी गोष्टी केल्या जातात. पदार्थविज्ञान क्षेत्रात अतिउच्च काम करणारे प्राध्यापक मेघनाथ साहा हे पहिले अध्यक्ष होते. राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे नियम आणि अटी ह्या इंग्लडच्या रॉयल सोसायटी च्या धर्तीवर बनवल्या गेल्या होत्या. २०१५ साली भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती शात्रज्ञ कलाम यांनी राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अभिनंदन करून त्यांचे भारताला असणारे बहुमोल योगदानाबद्धल सविस्तर माहिती त्यांच्या भाषणामध्ये सांगितली. १९३० साली ५७ सदस्यांने चालू झालेली अकादमीचे आज १८०० च्यावर सभासद आहेत. दरवर्षी आपापल्या संशोधन क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेल्या ५० शात्रज्ञांना अकादमीचे सभासदत्व देण्यात येते.
राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या माध्यमातून डॉ पिंजारी यांना हजारो तरुण संशोधक, वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि विद्यार्थी यांच्याशी सहयोग (Collaboration) करून नवनवीन तंत्रज्ञान आणि त्याच्यावर आधारित असणारे वेगवेगळी उत्पादने, कमी पैशामध्ये बाजारपेठेत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
डॉ पिंजारी हे माणदेशामध्ये घडलेले एक रत्न असून आतापर्यंत त्यांना अनेक जागतिक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये ब्रिक्स युवा शास्त्रज्ञ पुरस्कार, जागतिक युवा शास्त्रज्ञ पुरस्कार, चीन सरकारचे संशोधनासाठी पुरस्कार, अमेरिकन सरकारची फूलब्राईट (Fulbright) फेलोशिप, इत्यादी पुरस्कार मिळाले आहेत. डॉ. पिंजारी सध्या भारताच्या पंतप्रधानांचे शास्त्रीय सल्लागार डॉ. के. विजय राघवन यांच्या कमिटीमध्ये ऊर्जा आणि पाणी क्षेत्रामध्ये त्यांना मदत करत आहेत.
सध्या म्हसवड (ता.माण) येथे स्थायिक झालेले डॉ. पिंजारी हे मुळात केमिकल अभियांत्रीक आहेत आणि त्यांचे शिक्षण (B. Tech., M. Tech. आणि Ph.D) मुंबई येथील प्रतिष्ठित असणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या इन्स्टिटयूट ऑफ केमिकल टेकनॉलॉजी येथे झाले आहे. सध्या ते भारत सरकारचे शास्त्रज्ञ व प्राध्यापक म्हणून मुंबई येथील नॅशनल सेंटर फॉर नॅनोसायन्स आणि नॅनोटेकनॉलॉजी मध्ये काम करत आहेत. डॉ. पिंजारी हे विविध कंपन्यांना मार्गदर्शक म्हणून काम करतात. त्यामाध्यमातून त्यांनी समाजपयोगी असे विविध उत्पादने बाजारपेठेमध्ये आणली आहेत. त्यांच्या नावावर ७ पेटंट असून ८० च्यावर शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत आणि ३००० पेक्षा जास्त वेळा जगामध्ये त्याचा वापर करण्यात आला आहे.
डॉ. दिपक पिंजारी यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.