दैनिक स्थैर्य । दि. २० जानेवारी २०२३ । मुंबई । आपली मुले भविष्याची गरज म्हणून जगाच्या व्यवहारात वापरात असलेल्या इंग्रजी माध्यमातून शिकत असली तरीही प्रत्येक मराठी पालकांनी त्यांच्याशी घरात मराठीतच बोलले पाहिजे. मराठी ही आपली मायबोली आहे कोसाकोसावर तीची वेगवेगळी तऱ्हा आणि चव अनुभवता येते. तो जपण्यासाठी फक्त शासनाने प्रयत्न करायला पाहिजेत असे नव्हे तर मी महाराष्ट्रीय आहे असे म्हणणाऱ्या देशा-परदेशातील सर्वांचे हे नैत्तिक कर्तव्य आहे असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप खुडे यांनी केले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ग्रांटरोड येथील दादासाहेब भडकमकर मार्ग पोलीस ठाण्यात मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई यांच्या सहकार्याने दिवाळी अंक प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रदीप खुडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते व्यासपीठावरुन बोलत होते. पोलीस निरीक्षक दिलीप महाडिक, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष श्री रवींद्र मालुसरे, ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक सुनिल कुवरे, अरुण खटावकर, नितीन कदम व्यासपीठावर उपस्थित होते. खुडे साहेब पुढे असेही म्हणाले की, वाचनाची आवड असल्यामुळे मी शिक्षण चालू असतानाच कमी वेतनावर मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात काम केले आणि हजारो पुस्तके वाचली आहेत. वाचनाची भूक भागवण्यासाठी माझ्याकडे स्वतःचा ग्रंथालय ठेवा आहे. मराठी ही राजभाषा, ज्ञानभाषा, मातृभाषा, बोलीभाषा म्हणून मान्य पावली आहे. आजच्या धावत्या युगात इंग्रजी ही जगण्याची भाषा बनली असली तरी संस्कृतीची खाण असणाऱ्या भाषेत सुद्धा व्यावहारिकता वापरल्यास जगता येते. पालकांनी इंग्रजीचा अट्टाहास जरूर धरावा पण आपला पाल्य काकणभर मातृभाषेत सरस ठरावा याकडे लक्ष द्यायला हवे. संघाचे अध्यक्ष मालुसरे यांनी आपले विचार मांडताना म्हणाले की, वर्दीत असताना वेळप्रसंगी एका विशिष्ट जरबेची मराठी भाषा वापरणाऱ्या अनेक निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी लेखणी हाती घेऊन स्वत:ची वाचनीय ग्रंथसंपदा निर्माण केली आहे. अरविंद इनामदार साहेब, धनराज वंजारी, विश्वासराव नांगरे पाटील, सदानंद दाते, किरण बेदी, यांचा प्रामुख्याने उल्लेख केला याचबरोबर अनेक मराठी साप्ताहिक व मासिक बंद होत असताना दक्षता मासिक अजूनही टिकून आहे याचा आवर्जून उल्लेख केला. या कार्यक्रमाला असंख्य पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे पाल्य उपस्थित होते. संघाचे कार्याध्यक्ष रमेश सांगळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.