डॉ.लक्ष्मी आणि कन्या अमृताकडून भरतनाट्यमचे शास्त्रशुद्ध नृत्य सादर

उद्या (दि. 12) मुंबई येथील गुरु मीरा मेहता व शिष्यांची भरतनाट्यम सेवा


सातारा – भरतनाट्यम सादर करताना डॉ.लक्ष्मी आणि अमृता. (छाया – अतुल देशपांडे सातारा)

स्थैर्य, 11 फेब्रुवारी, सातारा : येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात आयोजित केलेल्या महाशिवरात्री संगीत व नृत्य महोत्सवामध्ये पाचवे नृत्य पुष्प मंगळवारी सायंकाळी सादर करताना पुणे येथील डॉ.लक्ष्मी पंडितार आणि त्यांची कन्या अमृता पंडितार यांनी बहारदार असे शुद्ध शास्त्रीय भरतनाट्यम सादर केले यामध्ये विविध 13 रचनांवर त्यांनी सादर केलेले नृत्य उपस्थित सातारकर प्रेक्षकांना अचंबित करणारे ठरले.

पदलालित्य,अभिनय आणि तितकीच नृत्य साधना या नृत्यातून उपस्थित प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली.आपल्या कार्यक्रमाची सुरुवात डॉ.लक्ष्मी आणि अमृता यांनी गणेश नमन करून पुष्पांजलीने केली. याची रचना नाट्य रागात होती. त्यानंतर मोहन रागातील ,आदि तालात तेलगू भाषेत असणार्‍या ..नर्तन गणपती.. हे गणेशावरील कीर्तन सादर झाले.त्यानंतर या दोन्ही मायलेकिनी गणेशावर मराठी भजन ..गजानना श्री गणराया..नृत्यातून सादर केले . सिंदूर आणि चंदनाचा लेप आहे अशा या गणरायाचे वर्णन करण्यात आले .त्यानंतर परत ..शिव सती ..ही देवी पार्वतीची स्तुती साठी कानडी भाषेतील रचना रागमालिका रागात सादर झाली .त्यानंतर शुद्ध नर्तन प्रकार असणारे ..शब्दम.. मिश्र चापू तालात सादर झाले .याची रचना चिन्नैया यांची होती. त्यानंतर ..वर्णम ..या डॉ.लक्ष्मी यांनी सादर केलेल्या नृत्यरचनेत तिचे सुरेख असे नृत्याचे पदलालित्य आणि अभिनय पाहायला मिळाला. हे वसंत रागात लिहिलेले पद आदि तालात सादर झाले यामध्ये नटराजाच्या सुंदर नृत्याचे वर्णन करण्यात आलेले होते .या नृत्यानंतर ..शंभो शंकरा ..या प्रसिद्ध मराठी गाण्यावर नृत्य सादर झाले .कानडी भाषेतील.. भाग्यदा लक्ष्मी बारम्मा ..ही रचना मध्यमावती रागात अतिशय सुरेखपणे सादर केली .ही रचना पुरंदरदास स्वामींनी लिहिलेली होती. संत तुकाराम महाराजांचे ..वृक्षवल्ली आम्हा सोयरे.. सादर होऊन पुन्हा एकदा ..नटरंग आदिनार ..सारखे नटेश कौतुकम सादर झाले .आणि नंतर भगवान विष्णूचे दहा अवतार असलेली त्याची स्तुती.. मंगलम..मधून सादर केली गेली आणि या कार्यक्रमाची सांगता झाली. पत्रकार अतुल देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

कार्यक्रम प्रसंगी वासुदेव नायर, मंदिराचे व्यवस्थापक चंद्रन,नारायण राव यांचे सह सातारा परिसरातील अनेक नृत्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ.लक्ष्मी पंडितार आणि त्यांची कन्या अमृता पंडितार यांचा सत्कार मंदिराच्या वतीने सुहास शहाणे,सौ.कांचन शहाणे,सौ.शैलजा व सौ.उषा शानभाग यांच्या हस्ते करण्यात आला. या नृत्य सादरीकरणाचे वेळीच सातारा शहरातील द्वारका अकादमीच्या विविध विद्यार्थ्यांनी भगवान शंकर व नटराज यावर आधारित चित्रे रेखाटली .यामध्ये सई महामुने, रेवती निकम ,आर्यन शिंदे ,तनिष्का निकम ,शिवानी निकम यांचा सहभाग होता. या सर्व चित्रकारांचाही सत्कार यावेळी नटराज मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आला.

दरम्यान, गुरुवार दि. 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता मुंबई येथील नुपूर नृत्य निकेतन डान्स अकादमीच्या गुरु मीरा मेहता व त्यांच्या शिष्यांची भरतनाट्यम सेवा संपन्न होणार आहे. यावेळी या कलाकारांना गायन साथ सुप्रसिद्ध गायक शिवप्रसाद एन.एन.हे करणार असून,मृदुंगावर साथ दीपु कृष्णन करणार असून व्हायोलिनवर साथ मधुरामन कुट्टी हे करणार आहेत. शिवप्रसाद हे अतिशय उच्च विद्या विभूषित असे आणि कर्नाटकीय शास्त्रीय संगीत मध्ये आपल्या आवाजाने सुप्रसिद्ध असे झालेले नाव आहे .केरळ येथील संगीत घराण्यात जन्मलेल्या शिवप्रसाद यांनी आतापर्यंत अनेक देश-विदेशात आपले कार्यक्रम सादर केले असून त्यांनी भरतनाट्यम सोबत शास्त्रीय संगीत तसेच कुचीपुडी ,कथकली आणि मोहिनीअट्टम या नृत्यांसाठीही गायन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!