डॉ. काशिनाथ घाणेकर जन्मदिन(१४ सप्टेंबर,१९३२)

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


ते मूळचे चिपळूणचे. लहानपणी अगदी खोडकर स्वभावाचे असलेले घाणेकर आपल्या गावातून रामोशांची घोडी घेऊन गावातून पळवत असत. डॉ. घाणेकर पेशाने दंत शल्यचिकित्सक होते. मात्र, ६० च्या दशकात त्यांनी चित्रपट क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला.

कलंदर व्यक्तिमत्वाचा मनस्वी कलावंत अशी घाणेकर यांची ओळख. आपल्या मनमोहक रूपाने आणि तितक्याच ताकदीच्या अभिनयावर स्वत:ला झोकून देत त्यांनी सादर केलेल्या भूमिकांनी कलारसिकांना मोहिनी घातली होती.

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला डॉ.काशिनाथ घाणेकर यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. वसंत कानेटकरांच्या ’रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकात त्यांनी साकारलेली छत्रपती संभाजीराजे यांची भूमिका अजरामर आहे. या नाटकातील छत्रपती संभाजीराजे यांची त्या तोडीची भूमिका दुसरं कोणीही साकारू शकणार नाही, हे त्यांची भूमिका पाहिलेले रसिक आजही सांगतात. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा अभिनय आणि भारदस्त आवाजाच्या जोरावर डॉ. घाणेकरांनी संभाजीराजांच्या भूमिकेतून सर्वांच्याच मनात घर केले होते. राजदत्त यांचे दिग्दर्शन असलेल्या, तसेच डॉ. घाणेकर आणि अभिनेत्री उमा यांची प्रमुख भूमिका असलेल्या ’मधुचंद्र’ या चित्रपटातील गाणीही अतिशय गाजली, तर ’अभिलाषा’ या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिकाही सर्वांच्या मनात घर करून गेली.

गारंबीचा बापू चित्रपट त्यांनी केला होता. चित्रपटाच्या शेवटी विठोबाssss म्हणून त्यांनी जी आर्त साद घातली होती ती आजही तशीच मनात घुमत राहते.

’हा खेळ सावल्यांचा’ या चित्रपटातील गोमू संगतीनं, माझ्या तू येशील काय…माझ्या पिरतीची रानी तू होशील काय या गीताने सर्वच रसिकांना अगदी मंत्रमुग्ध केले होते. 

कलाकार आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. काशिनाथ घाणेकर यांनी  ’इथे  ओशाळला मृत्यू, ’अश्रूंची झाली फुले’, ’गारंबीचा बापू’, ’आनंदी गोपाळ’, ’शीतू’, ’तुझे आहे तुजपाशी’, ’सुंदर मी होणार’ आणि ’मधुमंजिरी’ सारख्या नाटकांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनावर छाप सोडली, तर ’धर्मपत्नी ’, ’पाठलाग’, ’मराठा तितुका मेळवावा’, ’दादी मा’, ’मधुचंद्र’, ’एकटी’, ’प्रीत शिकवा मला’, ’अभिलाषा’, ’देव माणूस’, ’अजब तुझे सरकार’, ’झेप’ आणि ’हा खेळ सावल्यांचा’ सारख्या चित्रपटातही त्यांचा अभिनय सर्वांच्या पसंतीस पडला आहे. 

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांची कन्या कांचन यांच्याशी त्यांनी  विवाह केला. कांचन घाणेकर यांनी डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे संपूर्ण व्यक्तिमत्व आपल्या ’नाथ हा माझा’ या पुस्तकात शब्दबद्ध केले आहे.

आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्‍या या नटाचं, २ मार्च १९८६ रोजी वयाच्या ५२ व्या वर्षी अमरावतीमध्ये नाट्यप्रयोगाच्या दौर्‍यावर असताना झोपेतच निधन झालं. त्यांच्यासारख्या अष्टपैलू कलाकाराची रंगभूमीवरील कला आजच्या पिढीला पाहायला न मिळणं हे या पिढीचं दुर्भाग्य म्हणावं लागेल.

आणि काशिनाथ घाणेकर हा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला होता

संकलन :

प्रसाद जोग. सांगली ९४२२०४११५०


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!