स्थैर्य, मुंबई, दि. ७ : कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दि. ६ डिसेंबर २०२० रोजीच्या महापरिनिर्वाण दिनी अनुयायांनी चैत्यभूमीवर गर्दी न करता घरातूनच अभिवादन करण्याचे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
सह्याद्री अतिथीगृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय विभागाच्या योजनासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. आठवले म्हणाले, देशात व राज्यात कोविड विषाणूच्या प्रादुर्भावामुळे १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी अनुयायांनी घरातूनच अभिवादन केले होते, तसेच विविध सण उत्सव सुध्दा कोविड १९ विषयक मार्गदर्शक सूचनांनुसार साधेपणाने साजरे केले आहेत. आता ६ डिसेंबरला शासनातर्फे मार्गदर्शक सूचना देण्यात येतील त्यानुसार यावर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर न जाता घरातूनच अभिवादन करावे. शासकीयस्तरावर निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम आयोजित केला जाईल. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात येईल, असेही श्री. आठवले यांनी सांगितले.
यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर (स्मारक) चैत्यभूमी या वास्तूचे नूतनीकरण करण्याबाबतचा, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ योजना आणि इंदू मिल स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोविडविषयक मार्गदर्शक सूचना निर्गमित करणे व बैठक आयोजित करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे नागसेन कांबळे आणि अन्य पदाधिकारी तसेच मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि सामाजिक न्याय, नगरविकास, गृह विभागाचे अधिकारी, मुंबई महानगरपालिका, मध्य रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.