दैनिक स्थैर्य । दि. २४ डिसेंबर २०२१ । मुंबई । कोकणातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाला राज्यातील इतर महाविद्यालये संलग्न करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असून ही समिती आपला अहवाल सहा महिन्यात सादर करेल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली.
सदस्य अभिजित वंजारी यांनी राज्यात असलेल्या शासकीय विद्यापीठात संलग्नित महाविद्यालयांची गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात होणारी वाढ याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी श्री.सामंत बोलत होते.
श्री.सामंत म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, हे संलग्न विद्यापीठ असून या विद्यापीठास अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र आणि खाद्यपेय व्यवस्था तंत्रशास्त्र अभ्यासक्रम शिकविणाऱ्या महाविद्यालयांना संलग्नता देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, विद्यापीठ अधिनियम कलम ४(१) नुसार या विद्यापीठाचे अधिकार क्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ अधिनियम २०१४ अस्तित्वात येण्यापूर्वी राज्यात अस्तित्वात असलेल्या अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र आणि हॉटेल व्यवस्थापन व खाद्यपेय व्यवस्था तंत्रशास्त्र हे अभ्यासक्रम शिकविणाऱ्या महाविद्यालयांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची संलग्नता घेणे कलम ४ (२) नुसार वैकल्पिक आहे. तर, कलम ४ (३) नुसार, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, वास्तुशास्त्र परिषद किंवा औषधविद्या परिषद् यांच्या कार्यकक्षेखाली येणाऱ्या व्यवस्थापनाखेरीजच्या, पदवी आणि त्यावरील स्तरांवरील नव्याने स्थापन होणाऱ्या संस्थांकरिता संबंधित प्रदेशांतील विद्यापीठांच्या परवानगीशिवाय, राज्य शासनाच्या पूर्व मान्यतेने, संलग्नता देण्याची तरतूद आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ अधिनियम, २०१४ मधील कलम ३(६) नुसार विद्यापीठ मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद याठिकाणी प्रादेशिक केंद्र सुरु करेल तसेच विद्यापीठास अन्य ठिकाणीही प्रादेशिक केंद्रे स्थापन करता येतील, अशी तरतूद आहे. त्याचप्रमाणे कलम ३(७) नुसार विद्यापीठास कोल्हापूर, सोलापूर, अमरावती, नांदेड, जळगाव येथे, तसेच विद्यापीठास आवश्यक वाटेल अशा अन्य ठिकाणी उपकेंद्रे स्थापन करता येतील, अशी तरतूद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्रादेशिक केंद्र औरंगाबाद येथे सुरु करण्यात आले आहे. तसेच, विद्यापीठाचे उपकेंद्र सोलापूर येथे सुरू करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर विद्यापीठाची अन्य प्रादेशिक व उप केंद्रे स्थापन करण्याची कार्यवाही विद्यापीठ स्तरावर सुरु आहे.
५० विद्यापीठाचा सन २०१७ ते २०२१ या कालावधीचा बृहद् आराखडा तयार करण्यात आला असून तो विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच, सन २०२२ ते २०२६ या कालावधीचा वृहद् आराखडा तयार करण्याची कार्यवाही विद्यापीठ स्तरावर सुरू आहे.