
१५ फेब्रुवारी १९४६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दहिवडी (ता. माण) येथे घेतलेल्या ऐतिहासिक सभेला आज ८० वर्षे पूर्ण होत आहेत. या सभेत त्यांनी गांधीजी आणि काँग्रेसवर ओढलेल्या परखड ताशेऱ्यांचा आणि राजकीय भूमिकेचा वेध घेणारा ‘स्थैर्य’चा विशेष ऐतिहासिक लेख.
स्थैर्य, दि. १५ फेब्रुवारी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अमोघ वाणीने आणि प्रखर विचारांनी संपूर्ण देशाला जागृत केले. अशाच एका धगधगत्या विचारांची ठिणगी आजपासून बरोबर ८० वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याचे मुख्यालय असलेल्या ‘दहिवडी’ येथे पडली होती. १५ फेब्रुवारी १९४६ रोजी कायदेमंडळाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दहिवडीत एक ऐतिहासिक आणि अत्यंत स्फोटक सभा घेतली होती. दिल्लीहून तब्बल एक हजार मैलांचा प्रवास करून त्यांनी माण-खटावच्या जनतेला जे विचार दिले, ते आज आठ दशकांनंतरही तितकेच प्रासंगिक आणि अंगावर शहारे आणणारे आहेत.
१९४६ ची कायदेमंडळाची निवडणूक ही भारताच्या भवितव्याची दिशा ठरवणारी होती. इंग्रज सत्ता सोपवून जाण्याच्या तयारीत होते आणि घटना समिती स्थापन होणार होती. अशा या अत्यंत निर्णायक वळणावर डॉ. बाबासाहेबांनी दहिवडीत घेतलेल्या सभेत काँग्रेस, महात्मा गांधी यांचे राजकारण आणि अस्पृश्यांचे भवितव्य यावर सडेतोड प्रहार केले होते.
“माझा व गांधींचा झगडा वैयक्तिक नाही, तर समाजाच्या भवितव्याचा!”
या ऐतिहासिक सभेत बाबासाहेबांनी अत्यंत परखड शब्दांत आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली होती. ते म्हणाले होते, “सध्या वर्तमानपत्रांमध्ये गांधी आणि माझ्या झगड्याला ऊत आला आहे. गांधींचा टिळकांशी, गोखलेंशी झगडा होता, जो आता नामशेष झाला. पण माझा झगडा १९२० पासून तसाच चालू आहे. याचे कारण मला गांधींकडे स्वतःसाठी काहीही मागायचे नाही. मी माझ्या बुद्धीने आणि कर्तृत्वाने जीवन जगत आहे. माझा गांधींशी चाललेला झगडा हा वैयक्तिक नसून, तो या दबलेल्या समाजाच्या वतीने आणि त्यांच्या भवितव्यासाठी आहे.”
“हिंदूंचे स्वराज्य म्हणजे शुद्ध पेशवाई!”
स्वातंत्र्याच्या लढ्यावर भाष्य करताना बाबासाहेबांनी एका अत्यंत ज्वलंत वास्तवावर बोट ठेवले होते. “सगळे स्वराज्य मागत आहेत, पण ते स्वराज्य कोणाचे? जर त्या स्वराज्यात आम्हाला आमचे न्याय्य हक्क आणि अधिकाराच्या जागा मिळणार नसतील, तर असे हिंदूंचे स्वराज्य म्हणजे आमच्यासाठी ‘शुद्ध पेशवाई’ ठरेल,” असा घणाघात त्यांनी केला होता. पेशवाईत अस्पृश्यांच्या गळ्यात गाडगे आणि पाठीला खराटा बांधल्याचा दाखला देत, ती भयंकर परिस्थिती पुन्हा येऊ नये म्हणूनच हा लढा असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले होते.
फलटणचे उदाहरण देत ‘परावलंबना’वर प्रहार
दहिवडीच्या याच सभेत बाबासाहेबांनी शेजारील फलटण तालुक्याचे एक अत्यंत बोलके आणि डोळे उघडणारे उदाहरण दिले होते. फलटणमधील काही महार समाजाच्या लोकांकडे पूर्वी ४ चाहूर जमीन होती. मात्र, तत्कालीन ब्रिटिश राजवटीत तत्कालीन प्रशासनाने दररोज ५०० कुटुंबाना पंचपक्वान्न देण्यास सुरुवात केली होती. संस्थानाकडून उरलेले अन्न दररोज मिळत असल्याने तेथील महार समाज शेती करण्याकडे दुर्लक्ष करू लागला आणि उष्ट्या अन्नावर जगू लागला. परिणामी, जमिनीवर जंगल उगवले आणि त्या जमिनी इतर लोकांनी ताब्यात घेतल्या. पुढे ६०-७० वर्षांनी प्रशासनाने ते जेवण बंद केले, तेव्हा जमिनी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. “परावलंबी जीवनामुळे हक्क कसे जातात, याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यामुळे आता झोप सोडून जागे व्हा,” असा खणखणीत इशारा बाबासाहेबांनी दिला होता.
“मत म्हणजे ईश्वराने दिलेला संजीवनी मंत्र”
डॉ. बाबासाहेबांनी या निवडणुकीला ‘कौरव-पांडवांचा संग्राम’ संबोधले होते. त्यांनी जनतेला स्पष्ट बजावले होते की, “काँग्रेसचे तिकीट म्हणजे धन्याने कुत्र्याला दुसरीकडे जाऊ नये म्हणून गळ्यात घातलेला पितळेचा पट्टा आहे. जो काँग्रेसच्या तिकिटावर उभा आहे तो स्पृश्यांचा गुलाम आहे, त्याला पाडणेच गरजेचे आहे.” तसेच, मताचे महत्त्व विषद करताना त्यांनी सांगितले होते की, “मत म्हणजे ईश्वराने दिलेला संजीवनी मंत्र आहे. पैशांना भुलून राजकारण करू नका. राजकारणात आपला प्रतिनिधी कायदेमंडळात गेला तरच ज्या जात्याखाली आपण भरडले जात आहोत, त्या जात्याचा खुंटा आपल्या हातात येईल.”
दहिवडीत झालेल्या या सभेने संपूर्ण सातारा जिल्ह्यात राजकीय आणि सामाजिक जागृतीची एक मोठी लाट निर्माण केली होती. याच लढ्यातून पुढे ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’ (SCF) आणि तद्नंतर ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ (RPI) ची बीजे रोवली गेली. ८० वर्षांनंतर आज या सभेचे स्मरण करताना डॉ. बाबासाहेबांची दूरदृष्टी आणि तळागाळातील माणसाला सत्तेच्या प्रवाहात आणण्याची त्यांची तळमळ किती प्रबळ होती, याची प्रचिती येते.

