
दैनिक स्थैर्य | दि. २ ऑगस्ट २०२४ | फलटण |
लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांचे कार्य हे परिवर्तनाला दिशा देणारे असल्याचे प्रतिपादन मुधोजी कॉलेज फलटणचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रभाकर पवार यांनी केले.
दहिवडी कॉलेजमध्ये आयोजित लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त आणि कला वर्षातील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. अनिल दडस, मराठी विभागप्रमुख डॉ. मीरा देठे, प्रा. उज्ज्वला मदने, ग्रंथपाल प्रा. विष्णू वाघेरे यांच्यासह महाविद्यालयातील कला विभागातील विविध विषयांचे प्राध्यापक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ. पवार म्हणाले की, डॉ. अण्णा भाऊ साठे यांनी वंचित आणि शोषितांचे दुःख जाणले. मुंबईमधील देहविक्री करणार्या स्त्रिया, कामगार, खाणकार, इत्यादींचे दुःख सर्वात पहिल्यांदा जाणून त्यांना आपल्या साहित्यात शब्दबध्द केले. अण्णा भाऊ यांनी दीड दिवस शिक्षण घेतले, तरी त्यांच्या साहित्य निर्मितीमागे कर्मवीर भाऊराव पाटील, वारणेच्या खोर्यातील सतू भोसले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा होती. रशियातील अण्णा भाऊ यांच्या प्रवासाचे वर्णन करत अवघा प्रसंग त्यांनी उपस्थितांसमोर आपल्या भाषणातून उभा केला.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या कार्यातून अन् साहित्यातून देशाला परिवर्तनाची दिशा मिळाली. कर्तृत्वासह गुणांनी माणसे मोठी होतात. लोकशाहीर अण्णा भाऊ यांचे सर्व प्रकारचे साहित्य ही वैचारिक क्रांतीची बैठक घालून देणारे आणि मार्गदर्शक असल्याचेही ते म्हणाले. तसेच अण्णा भाऊंच्या साहित्यातील स्त्रिया या रडणार्या नसून लढणार्या आहेत, त्यामुळे स्त्रियांनी अण्णा भाऊंचे कार्य वाचून त्यातील मार्गदर्शन अंगिकारले पाहिजे, असा सल्ला दिला.
अण्णा भाऊ हे साम्यवादी विचारांचे असले तरी भारतातील साम्यवाद्यांकडून त्यांची उपेक्षा झाल्याची खंतही बोलून दाखवली.
प्रा. डॉ. अनिल दडस अध्यक्षीय भाषणातून म्हणाले की, सर्व महापुरुषांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांचे विचार अंगिकारायला पाहिजे. महापुरुषांसह सर्व लेखकांचे साहित्य हे नैतिकता शिकवत असल्याने ते आवर्जून वाचायला पाहिजे.
यावेळी कला विभागातील प्रथम वर्षातील नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.प्रास्ताविक डॉ. मीरा देठे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रविण भोसले यांनी केले, तर आभार प्रा. संगीता जानकर-इमडे यांनी मानले.