
थेट WhatsApp वर मिळवा
जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीतून राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी केंद्रांच्या पायाभूत सुविधा बळकटीकरणासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. नवीन इमारती, दुरुस्ती, स्वच्छ स्वच्छतागृहे आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपकरणांसाठी विशेष अनुदानाची ही तरतूद करण्यात आली आहे.
स्थैर्य, सातारा, दि. ०४ ऑक्टोबर : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) माध्यमातून राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्यांच्या विकासासाठी निधीची मोठी तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पायाभूत सुविधांच्या अभावाचा सामना करणाऱ्या ग्रामीण भागातील हजारो शाळा आणि अंगणवाडी केंद्रांना मोठा दिलासा मिळणार आहे. शाळांच्या नूतनीकरणासह विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष तरतूद या योजनेत समाविष्ट आहे.
सुरक्षा अन् स्वच्छतेला प्राधान्य
या नवीन योजनेअंतर्गत नव्या इमारतींच्या बांधकामासाठी २० लाख रुपयांपर्यंत तर जुन्या वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी ५ लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. तसेच शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये स्वच्छतागृहांची निर्मिती व दुरुस्ती करण्यासाठी कमाल ३ लाख रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
सुरक्षा भिंत अन् सीसीटीव्ही यंत्रणा
मोकळ्या जागेतील शाळा आणि अंगणवाड्यांच्या सुरक्षेसाठी संरक्षण भिंत उभारण्यासाठी ५ लाख रुपये दिले जातील. शाळा परिसरात सौर ऊर्जा, विद्युतीकरण यासाठी ५ लाख रुपये तर सीसीटीव्ही आणि अग्निशमन यंत्रणा बसवण्यासाठी ३ लाख रुपयांपर्यंतचा खर्च डीपीसी निधीतून केला जाणार आहे.





