दैनिक स्थैर्य । दि. १४ डिसेंबर २०२१ । सातारा । महाराष्ट्र राज्य गृहविभागाने वाहतुकीसंबंधी आकारण्यात येणार्या दंडामध्ये वाढ केली असून सर्वच दंडाची रक्कम दुप्पटीहून अधिक करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातही हा नियम लागू झाला असून शहरवासीयांनी वाहतुकीबाबत नियमांचे पालन करुन सहकार्य करावे. अन्यथा कारवाई केली जाणार असल्याचा इशारा सपोनि विठ्ठल शेलार यांनी दिली आहे.
महाराष्ट्र शासनाने मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम 2019 ची अंमलबजावणी करण्याबाबत सूचना काढली आहे. या अधिसुचनेनुसार ई चलान प्रणालीमध्ये ही वाढ दि. 11 रोजी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे. यामुळे वाहन चालवताना वाहन चालकांनी वाहतुकीचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घ्यावी. मोटार वाहन कायद्याचे सर्व नियम पाळूनच वाहन चालवावे. अन्यथा नवीन नियमाप्रमाणे त्या त्या नुसार कारवाई केली जाणार आहे.
वाहतुक उल्लंघनाबाबत एकूण 31 प्रकार आहेत. यामध्ये सर्व बाबी समावेश करण्यात आल्या असून अनेक बाबींमध्ये न्यायालयात प्रकरण पाठवण्याची तरतुद करण्यात आली आहे.