नरवणेत वाळूच्या लिलावरून डबल मर्डर, चुलत भावांच्याच दोन गटात हाणामारी, तिघे गंभीर


स्थैर्य, दहिवडी, दि.१८: नरवणे, ता. माण येथे वाळूच्या लिलावाच्या कारणावरून दोन चुलत भावांच्या दोन गटात सकाळी साडेदहा वाजता झालेल्या मारहाणीत दोघांचा मृत्यू झाला तर तीनजण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर नरवणे गावात तणाव निर्माण झाला आहे.

तहसीलदार बाई माने यांनी नरवणे येथे जप्त केलेल्या वाळूचा लिलाव 22 फेब्रुवारी रोजी केला होता. पाच ब्रास वाळूचे चंद्रकांत जाधव यांनी 33 हजार रुपये भरले होते. व लिलाव घेतला होता. दरम्यान विलास धोंडीबा जाधव यांनी तलाठ्याकडे तक्रार केली की चंद्रकांत नाथाजी जाधव हे बेकायदा वाळू उपसा करत आहेत. चंद्रकांत जाधव यांनी वाळू लिलाव घेतल्याचे सांगितले. त्यातूनच वाद वाढत गेला व आज सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांच्यात व त्यांचे चुलत भाऊ विलास धोंडीबा जाधव यांच्या गटामध्ये मारामारी झाली. दोन्ही गटाकडून लाकडी दांडके, चाकु, तलवार, लोखंडी पाईप याचा वापर झाला. यात अनेक जण जखमी झाले. जबर जखमी झालेले चंद्रकांत नाथाजी जाधव, विलास धोंडीबा जाधव यांना दहिवडीमध्ये ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

विलास धोंडिबा जाधव यांच्या कुटुंबातील विश्‍वास जाधव, विशाल जाधव जखमी असून त्यांना सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नसून दोन्ही कुटुंबीय यांनी परस्पर तक्रारी दाखल केल्या आहेत.

दोन्ही कुटुंबीयांत पूर्व वैमनस्य होते. त्यामुळे मृत चंद्रकांत जाधव यांनी घराला सीसीटीव्ही बसवलेले आहे. ते सध्या बंद अवस्थेत आहे. सातारा येथील श्‍वान पथक घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, आरोपी यांनी पळ काढल्याने घटनास्थळावर कोणीही दिसले नाही.


Back to top button
Don`t copy text!