मराठा आरक्षण आणि छत्रपतींचा सन्मान भाजपाला शिकवू नका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा सचिन सावंत यांना इशारा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.२६: मराठा समाजाला भारतीय जनता पार्टीने आरक्षण दिले आणि छत्रपती संभाजीराजे यांना खासदारही भाजपानेच केले. मराठा समाजाला सदैव फसविणाऱ्या काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला शिकवू नये, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मराठा आरक्षण आणि छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी भाजपावर केलेल्या टीकेचा समाचार मा. प्रवीण दरेकर यांनी घेतला.

त्यांनी सांगितले की, १९९९ पासून काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस यांची पंधरा वर्षे राज्यात तर दहा वर्षे केंद्रात सत्ता होती. त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या ऐवजी मराठा कार्यकर्त्यांना मारझोड करण्याचेच काम तुमच्या सरकारने केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या सरकारनेच मराठा समाजाला आरक्षण दिले व ते हायकोर्टातही टिकवले. आमचे सरकार होते तोपर्यंत सुप्रीम कोर्टातही त्याला स्थगिती आली नाही. हे सगळे करताना प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील हेच मराठा आरक्षणासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष होते. त्यांना मराठा आरक्षणाची कायदेशीर बाजू चांगली समजते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

ज्यांना मराठा समाजाचे असलेले आरक्षण टिकवता आले नाही त्या काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी मा. चंद्रकांतदादांना आरक्षणाची कायदेशीर बाजू शिकवू नये. मराठा समाजाला कायदेशीर पद्धतीने आरक्षण कसे द्यायचे आणि ते कोर्टात कसे टिकवायचे आम्हाला चांगले समजते. तुम्हाला जमले तर आता किमान सुप्रिम कोर्टात फेरविचार याचिका तरी दाखल करा, असा टोला त्यांनी हाणला.

ते म्हणाले की, केंद्रामध्ये सत्ता आल्यानंतर भाजपाने छत्रपती संभाजीराजे यांना राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार केले. त्यापाठोपाठ प्रयागराज (अलाहाबाद) येथे झालेल्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष मा. अमित शाह यांनी संभाजीराजेंचा सन्मान पक्षाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांसमोर भर सभागृहात केला. त्यावेळी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वांनी उभे राहून संभाजीराजेंचे अभिनंदन केले. काँग्रेसने कोल्हापूरच्या छत्रपतींचा काय सन्मान केला हे आधी सचिन सावंत यांनी सांगावे. कधीतरी काँग्रेसकडून आपल्याला आमदारकी मिळेल यासाठी सदैव वाट पाहत या आशेने खुळावलेल्या सचिन सावंत यांनी उगाच खा. छत्रपती संभाजीराजे यांची उठाठेव करू नये.


Back to top button
Don`t copy text!