स्थैर्य, फलटण, दि. ०२ : फलटण शहरातील वेगवेगळ्या कोव्हीड हॅास्पीटल्समध्ये सुमारे ३५० रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी दररोज सुमारे १०० ते १२५ रुग्णांना रेमडेसीवीर इंजेक्शनची गरज असल्याचे डॅाक्टरांचे म्हणणे आहे. मात्र सध्याचा रेमडेसीवीर इंजेक्शन पूरवठा अतिशय त्रोटक/कमी आहे. दररोज फक्त २५ ते ३० इंजेक्शन्स तालुक्यासाठी प्राप्त होत आहेत. ज्या रुग्णांना सर्वाधिक आवश्यकता आहे. त्या रुग्णांसाठी डॅाक्टर उपलब्ध इंजेक्शन वापरत आहेत. सबब इतर रुग्णांच्या नातेवाईकांना आवाहन आहे की त्यांनी कोणत्याही हॅास्पीटलवर / डॅाक्टरांवर याबाबत दडपण आणू नये, असे आवाहन फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी केलेले आहे.
सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह व प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या आदेशानुसार उपलब्ध इंजेक्शन्सचे वाटप जिल्ह्यातील हॅास्पीटलनिहाय केले जात आहे. तरी उपलब्धतेनुसार व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे रेमडेसीवीर इंजेक्शन्स हॅास्पीटलला उपलब्ध करुन दिली जातील, असेही प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी स्पष्ट केलेले आहे.