ट्रान्सफॉर्मर चोरांच्या मुसक्या आवळा; आरडगाव-हिंगणगावच्या शेतकर्‍यांची मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १ मे २०२३ | फलटण |
ट्रान्सफॉर्मरच्या वाढत्या चोरीमुळे आरडगाव, हिंगणगाव परिसरातील पिके धोक्यात आली आहेत. या ट्रान्सफॉर्मर चोरांच्या मुसक्या आवळा, अशी परिसरातील शेतकर्‍यांनी मागणी केली आहे. पाणी असूनही विजेअभावी हाताशी आलेली शेतीपिके धोक्यात असल्याने शेतकरीवर्ग नैराश्यात आहे.

फलटण तालुक्यातील हिंगणगाव येथील विजेचा पहिला ट्रान्सफॉर्मर चोरीला गेला. त्यानंतर दुसराही ट्रान्सफॉर्मर चोरीला गेल्याने शेतकर्‍यांची अवस्था दयनीय झाली आहे. विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अथक प्रयत्नाने धोम-बलकवडीचे पाणी खंडाळा, फलटण परिसरात कॅनालद्वारे आल्याने येथील शेतीकरी वर्ग सुखावला आहे. मात्र, दिवसेंदिवस वीज वितरणच्या डीपी चोरीचे प्रमाण वाढत असल्याने पाणी असूनही विजेअभावी हाताशी आलेली पिके धोक्यात असल्याने शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे. मध्यंतरी आरडगावमधीलही एक डीपी चोरीला गेला होता.

डीपी चोरीच्या तक्रारी पोलीस स्टेशनलाही दिल्या गेल्या आहेत. मात्र, डीपी चोरीचे प्रमाणात वाढच होताना दिसत आहेत. लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल वायकर व त्यांच्या टीमने लोणंद व परिसरातील अनेक घडलेले गंभीर गुन्हे उघडकीस आणल्याने त्यांचा व त्यांचे सहकारी यांचा सातारा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सत्कार करणेत आला आहे.
आता मात्र आरडगाव, हिंगणगाव, चव्हाणवाडी या परिसरात असणार्‍या शेतकर्‍यांनी लोणंद सपोनि वायकरसाहेब यांच्याकडे एकच मागणी केली आहे की, या ट्रान्सफॉर्मर चोरणार्‍या टोळीच्या मुसक्या आवळा व आमची पिके वाचवा.

ऐन उन्हाळ्यात विजेचा खेळखंडोबा
डीपींची वाढती चोरी, विजेचे असणारे लहरी भारनियमन, त्यातच सूर्य आग ओकत असतानाही पाणी असूनही वीज नसल्याने शेतकर्‍यांची हातात आलेली पिके जळून चालली आहेत. साहेब, ट्रान्सफॉर्मर चोरांना आतातरी आवरा हो…..
– डॉ.पद्मराज भोईटे, हिंगणगाव

धोम-बलकवडीच्या आलेल्या पाण्यामुळे हिंगणगाव परिसरातील पाझर तलाव, धरणे थोड्याफार प्रमाणात भरलेली असल्याने या परिसरात विहिरींचे प्रमाण खोदण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वीज मागणी वाढली, मात्र त्या पटीत डीपींची संख्या वाढलेली नसल्याने असणार्‍या डीपींवर लोड येऊन ते बंद पडत आहेत. त्यातच डीपींच्या वाढत्या चोरीमुळे पाणी असूनही शेतकर्‍यांची पिके धोक्यात आहेत. तात्काळ डीपी चोरट्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळाव्यात, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांमधून होत आहे.


Back to top button
Don`t copy text!