दैनिक स्थैर्य | दि. १८ सप्टेंबर २०२३ | फलटण |
अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार याविरोधात संघर्ष करणारी तरुणाई देशाला महासत्ता बनविणार आहे. महापुरूषांना जातीच्या चौकटीत बंदीस्त करून तरुणाईची माथी भडकवू नका, असे मत श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचे कथाकार, प्रबोधनकार, व्याख्याते प्रा. रवींद्र कोकरे यांनी व्यक्त केले.
आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक तरुण मंडळ आयोजित २३२ व्या जयंतीनिमित्त खांडज (बारामती) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रतिमा पूजन, क्रांतीज्योत प्रज्वलन, गुणवंत विद्यार्थी सत्कार, ज्येष्ठांचा सन्मान, महाप्रसाद असा भरगच्च कार्यक्रम संपन्न झाला. मंडळाचे अध्यक्ष पोपट बुजले, आयोजक मालोजी जाधव, रयत सेवक अंकुश शिंदे सर, नाथसन फर्मस अध्यक्ष नितीन तावरे, आखाडाकार युवराज खलाटे, व्याख्याती करिष्मा आटोळे, दिनकर काळे, हणमंत कोकरे, तानाजी जाधव गुरुजी, पंचायत समिती माजी सभापती डॉ. अनिल सोरटे मान्यवरांसह बहुसंख्येने ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.
प्रा. कोकरे म्हणाले की, आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांचा इतिहास नव्याने संशोधन होणे गरजेचे आहे. तरुणाईने वैचारिक क्रांती करून आपल्या ध्येयाने प्रेरित होणे काळाची गरज आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी बालव्याख्याती कु. वीर अहिल्या मिथुन आटोळे यांनी ‘शिवप्रताप’ विषयावर भाषण केले. प्रास्तविक व सूत्रसंचलन आप्पासो महाराज जाधव यांनी केले. आभार नवनाथ जाधव यांनी मानले.