…..कोणत्याही नगरसेवकांनी माझं तिकीट फिक्स आहे, असं गृहीत धरू नका : श्रीमंत रामराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑक्टोबर २०२१ । फलटण । सध्या फलटण शहरामध्ये नगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. आताच्या असलेल्या कोणत्याही नगरसेवकांनी व नगरसेविकांनी माझं पुढचं तिकीट फिक्स आहे, असं गृहीत धरू नका. झालेले काम, केलेले काम यासह इतर पॅरामीटर लावूनच यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत तिकीट वाटप करण्यात येणार आहे, असे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

फलटण येथील मंगळवार पेठ येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभात श्रीमंत रामराजे बोलत होते. यावेळी फलटणचे आमदार दीपक चव्हाण, नगराध्यक्षा सौ. नीता मिलिंद नेवसे, मुख्याधिकारी संजय गायकवाड, जेष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, किशोर नाईक निंबाळकर, सनी अहिवळे, अजय माळवे, बाळासाहेब मेटकरी, नगरसेविका सौ. वैशाली अहिवळे, सौ. सुवर्णा खानविलकर, सौ. ज्योत्स्ना शिरतोडे, सौ. प्रगती कापसे, सौ. दीपाली निंबाळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्रीमंत रामराजे म्हणाले कि, आता कोणत्याही क्षणी नगरपालिका निवडणूक लागेल अशीच सद्य परिस्थिती आहे. गेल्या पंचवीस ते तीस वर्षांमध्ये फलटण शहराचा टप्प्पाटप्प्याने विकास पूर्णत्वास नेहलेला आहे. १९९१ साली नगराध्यक्ष असताना जे फलटणचे स्वप्न बघितले आहे. त्या दृष्टीनेच विकासकामे करत फलटण हे एक आयडियल शहर बनवण्याचा माझा मानस आहे.

गेल्या जवळपास दोन वर्षे कोरोना या महाभयंकर विषाणूशी आपण सर्व जण लढत आहोत. आता कुठेतरी कोरोनाची साथ आटोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागलेली आहेत. कोरोनाच्या बाबतीतली काळजी आपल्याला ह्या पुढे सुद्धा घ्यावी लागणार आहे. मास्क घालणे, हात वारंवार धुणे व सामाजिक अंतर पाळणे या मुळेच कोरोनाची साथ आटोक्यात येत आहे. फलटण शहरामध्ये लसीकरण सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. तरी नागरिकांनी मला काहीही होणार नाही, ह्या भ्रमामध्ये राहू नये व काळजी घ्यावी, असे आवाहन सुद्धा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी या वेळी केले.

नंदकुमार भोईटे हे नगरपालिकेच्या कार्यक्रमात नाही, असा आपला पहिलाच कार्यक्रम आहे. नगरपालिकेमध्ये काम करत असताना त्यांचे कायमस्वरूपी स्मरण आपल्या सगळ्यांना राहणार आहे. त्यांनी कायमच आपल्याला साथ देत फलटण नगरपरिषदेच्या माध्यमातून चांगले काम केलेले होते, असेही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी या वेळी स्पष्ट केले.

आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसी जाचाची भीती दाखवत धमकी येत आहेत कि, तुम्ही आमच्याकडून उभे रहा; अश्या प्रकारचे प्रेशर आपल्या कार्यकर्त्यांच्या वर टाकले जात आहे. जर कोणत्याही कार्यकर्त्याला धक्का लागला, तर आम्ही सुद्धा शांत बसणार नाही. विरोधी गटाला असले प्रकार करण्याशिवाय इतर काहीही जमत सुद्धा नाही, असेही या वेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!