स्थैर्य, दि.६: तीन दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले डोनाल्ड ट्रम्प उपचारानंतर रुग्णालयातून सोमवारी रात्री व्हाईट हाउसमध्ये पोहोचले. ते म्हणाले- कोरोनाला घाबरण्याची गरज नाही. मात्र, त्यांच्या डॉक्टरांनी असे सांगितले आहे की राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण, धोका टळलेला नाही. ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये येताच मास्क काढून घेतला. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासह 15 अधिकारी आणि खासदार संसर्गित असल्याचे आढळले आहे.
काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की ट्रम्प 15 ऑक्टोबरला होणाऱ्या दुसर्या प्रेसिडेंशियल डिबेटमध्ये भाग घेऊ शकतात. मात्र, व्हाइट हाउसकडून अद्याप याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
उपचार सुरूच राहतील
ट्रम्प तीन दिवसांनंतर व्हाईट हाउसमध्ये दाखल झाले. येथे त्यांचे पर्सनल डॉक्टर सीन कोनले म्हणाले – धोका अद्याप टळलेला नाही. राष्ट्राध्यक्षांनी काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांच्यावरील उपचार सुरूच राहतील. ट्रम्प हे हॉस्पिटलमधून सूट आणि मास्कमध्ये निघाले. माध्यमांकडे बघून त्यांनी हात दाखवला. माध्यमांनी दूरुन प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. पण, ते फक्त धन्यवाद-धन्यवाद म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी यादरम्यान त्यांनी मास्कही हटवला होता. रुग्णालयातून बाहेर निघाल्यानंतर आपले ऑफिशियल हेलिकॉप्टर मरीन वनमध्ये बसले आणि 10 मिनिटांत व्हाइट हाउसमध्ये पोहोचले.
लोकांनी लाइव्ह पाहिले
ट्रम्प हे विना मास्कचे व्हाईट हाऊसमध्ये जात असताना लोकांनी टीव्हीवर लाइव्ह पाहिले. राष्ट्राध्यक्षांचे डॉक्टर सीन कोनले यांनी अनेक कठीण प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार दिला. ट्रम्प यांच्या फुफ्फुसांची अवस्था काय आहे तसेच सर्वात मोठा प्रश्न ट्रम्प यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे का. अशा अनेक प्रश्नाची उत्तरे त्यांनी दिली नाहीत. ते म्हणाले की, अध्यक्षांना अँटी-व्हायरल ड्रग रीमोडेसरचा शेवटचा डोस दिला गेला आहे, उपचार सुरूच राहतील. आठवड्याच्या शेवटपर्यंत बर्याच गोष्टींची प्रतीक्षा करावी लागेल. पण, या क्षणी आपण सुटकेचा श्वास घेतला आहे. असे ते म्हणाले.
धोका टळलेला नाही
कोनले यांनी स्पष्ट केले की, राष्ट्राध्यक्षांच्या तब्येतीवर सतत नजर ठेवली जात आहे आणि धोका अद्याप टळलेला नाही. ट्रम्प यांची प्रेस सेक्रेटरी कॅली मॅक्केनीही पॉझिटिव्ह आढळली आहे. ट्रम्प यांनी रुग्णालयातून निघण्यापूर्वी म्हटले – कोविड-19 ला घाबरण्याची गरज नाही. याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होऊ देऊ नका. नंतर त्यांनी एक व्हिडिओही पोस्ट केला. ते म्हणाले- एक गोष्ट निश्चित आहे. कोरोनाला आपल्या आयुष्यावर प्रभुत्व मिळवू देऊ नका. आपण सहज विजय मिळवू शकतो.
प्रेसिडेंशियल डिबेटमध्ये सहभागी होतील
काही मीडिया रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, ट्रम्प 15 अक्टोबरला होणाऱ्या दुसऱ्या प्रेसिडेंशियल डिबेटमध्ये अवश्य सहभागी होतील. यासाठी त्यांनी तयारीही सुरू केली आहे. त्यांचे कॅम्पेन मॅनेजर रायन नोब्स म्हणाले – ट्रम्प दुसऱ्या डिबेटमध्ये सहभागी होतील. मला याविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या कॅम्पेन टीमला याविषयी कमिशन ऑफ डिबेट म्हणजेच सीपीडीला याविषयी माहिती द्यावी लागेल. अधिकृत घोषणानंतर केली जाईल.