आ. शिवेंद्रसिंहराजेंचा इशारा; नागरिकांच्या आरोग्याबाबत तडजोड खपवून घेणार नाही
स्थैर्य, सातारा, दि. 15 : सर्वत्र कोरोनाचा कहर सुरु असून सातार्यातही कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. महाराष्ट्रात पुणे आणि मुंबई मध्ये सर्वाधिक रुग्ण आढळत असताना पुण्यातील जैविक कचरा सातारा नगर पालिकेच्या कचरा डेपोमध्ये आणला जातो आणि सातारकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार होतो, ही मोठी चिंताजनक आणि संतापजनक बाब आहे. सातारकरांच्या आरोग्याबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. सातारकरांच्या अडचणीत भर टाकण्याचा प्रकार कोणी करु नये, असा इशारा आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, सातार्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. असे असताना पुणे महानगर पालिकेतील जैविक कचर्याचे दोन डंपर सातारा कचरा डेपोत येतात. सोनगांव कचरा डेपोत दिवसाला १०० किलो विघटन क्षमता असताना तब्बल ४- ५ टन जैविक कचरा सातार्यात आणला जातो, ही बाब अत्यंत चुकीची आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक आहे. सातारा पालिका प्रशासनाने हा प्रकार का केला? याबाबत नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष यांना तरी माहिती आहे का? मुख्याधिकाऱ्यानी मनमानी कारभार करुन नागरिकांच्या जीवाशी खेळू नये. पुण्यातल्या जैविक कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी पिंपरी- चिंचवड, लोणावळा अथवा अन्य नजीकच्या नगर पालिका आहेत. असे असताना हा कचरा सातार्यात आला कसा? यासाठी नगर पालिकेने परवानगी दिली होती का? मु‘याधिकार्यांनी यासाठी परवानगी दिली कशी? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
सातारा शहरानजीकची उपनगरे, काही गावांतील कचरा सोनगाव कचरा डेपोमध्ये टाकण्यासाठी नगर पालिका आडकाठी आणत असते. असे असताना पुण्यातील धोकादायक जैविक कचरा सोनगाव कचरा डेपोमध्ये येतो आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो, ही बाब गंभीर आहे. कोणीही काहीही टाकावे यासाठी सातारा हे डंपींग ग्राउंड आहे काय? असा संतापजनक सवाल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित केला आहे. सातार्यात आधीच अडचणी आहेत त्यात भर टाकण्याचा हा प्रकार आहे. कोरोनामुळे भितीचे वातावरण असताना जैविक कचरा आल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सातारकरांसह आसपासच्या गावातील लोकांना धोका होवू शकतो. त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार कदापी खपवून घेतले जाणार नाहीत. पालिका प्रशासनाने तातडीने हा प्रकार थांबवून सातारकरांच्या आरोग्याबाबत सतर्क रहावे, अशी सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिली आहे.