फलटणमध्ये डॉल्बीला बंदीच!; मंडळांनी सहकार्य करण्याचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 31 ऑगस्ट 2024 | फलटण | येणाऱ्या गणेश उत्सव काळामध्ये डॉल्बी किंवा कर्णकर्कश आवाजात साऊंड सिस्टीम लावण्यास शासनाच्या नियमानुसार बंदी असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी दिली. गणेश उत्सव मंडळांनी प्रशासनास सहकार्य करावे!; असे आवाहन फलटण प्रशासनाच्या वतीने तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी केले.

फलटण येथील नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, सुनील महाडिक यांच्यासह महावितरण व नगरपरिषदेचे कर्मचारी व गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना तहसीलदार डॉ. जाधव म्हणाले की; संपूर्ण राज्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. गणपती उत्सवाला मोठा इतिहास आहे. त्यामुळे गणपती उत्सव साजरा करताना स्थानिक प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका ही गणेशोत्सव मंडळांनी घेतली पाहिजे.

जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या आदेशानुसार गणेश उत्सव काळामध्ये जे कर्णकर्कश साऊंड सिस्टीम लावतील अश्या सगळ्यांवर कारवाई करण्यात येणार आहेत. यामध्ये मंडळांनी रीतसर परवानगी घ्यावी. आपण गणेश उत्सव काळामध्ये जे सोशल मीडियावर मेसेज पाठवणार आहोत यामुळे कोणताही जातीय तेढ निर्माण होणार नाही; याची काळजी घेणे गरजेचे आहे. सामाजिक समतोल बिघडला नाही पाहिजे याची काळजी घेणे गरजेचे आहे; असे मत पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक शहा म्हणाले की; शासनाच्या नियमानुसार डॉल्बीला परवानगी नाही. दुसऱ्याला परवानगी आहे; आणि आम्हाला नाही असे म्हणणे हास्यास्पद आहे. डॉल्बी बाबत समाजाने जागृत होणे गरजचे. डॉल्बी वाजलीच नाही पाहिजे. जर गणेश उत्सव काळात डॉल्बी लावली तर कारवाई करण्यात येणार आहे. डॉल्बी मुळे मोठा त्रास होत असतो. डॉल्बी मुळे समाजातील अनेक घटकांना त्रास होत असतो.

समाजातील कोणत्याही सणामध्ये बंदी घालणे, किंवा परवानगी देणे म्हणून ही बैठक नाही. डिजे हे किती टॉप, किती बेस यावर अवलंबून असते. गणपती उत्सव हा 10 दिवस सुरू असल्याने या काळातच साऊंड सिस्टीम बद्दल चर्चा होते. याच्या मुळे नक्कीच त्रास होत असतो. याचा त्रास हा नक्की सगळ्यांना झाला आहे. डिजे बंदी घालणे ही फक्त पोलिसांची जबाबदारी नाही; मंडळांनी काळजी घेणे गरजेचे आहे; असे मत ग्रामीण पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक महाडिक म्हणाले की; या काळात पोलिसांना सुद्धा सुट्टी नसते. त्यामुळे आम्ही सुद्धा नक्कीच माणूस आहोत याचा विचार करणे गरजेचे आहे. आम्ही यामध्ये वेळप्रसंगी कडक कारवाई करणे गरजेचे असते. जेंव्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यावर जनतेने पोलिसांच्या बाजूने उभे राहणे गरजेचे आहे.

ग्रामीण भागात गणपती विसर्जन मिरवणुकीत जबाबदारी ही पोलीस पाटील यांच्यावर येत असते; त्यामुळे या वर्षी पासून पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायत प्रशासनाला सुद्धा विसर्जन मिरवणूक नियोजन करण्यास सांगणे गरजेचे आहे. आता पुन्हा नव्याने गणराया अवॉर्ड सुरू करण्यात यावे. यामध्ये प्रशासन व पत्रकार यांची एक संयुक्त कमिटी होती. तरी पुन्हा नव्याने आता ह्या वर्षी पासून गणराया अवॉर्ड सुरू करण्यात यावे; असे मत दुधेबावीचे पोलीस पाटील हनुमंतराव सोनवलकर यांनी व्यक्त केले.

फक्त गणेश उत्सव म्हणाल्यावर डीजे बंदी का येत ? यामध्ये दहीहंडी, शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यांना बंदी का नाही ? जर बंदी करायची असेल तर सरसकट बंदी करावी; अशी मागणी यावेळी गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

राजाळे गावामध्ये गेली 24 वर्षे एक गाव एक गणपती सुरू आहे. यामध्ये सर्वच सामाजिक घटकातील अध्यक्ष व उपाध्यक्ष असे निवडत असतो. प्रतिवर्षी सर्वांना संधी द्यायचे काम आम्ही करत असतो! असे मत राजाळे येथील गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मत यावेळी व्यक्त केले.

गणपती मंडळांनी रस्ता आडवू नये. आता भक्ती भाव न करता धिंगाणा सुरू आहे. यामध्ये महिलांवर अत्याचार झाल्या असल्याच्या घटना सुद्धा आपल्या राज्यात अनेक ठिकाणी झाल्या आहेत. यामध्ये जर डिजे किंवा तत्सम मुळे जर नागरिकांना त्रास झाला तर त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. यामध्ये सामाजिक उपक्रम साजरे करणे गरजेचे आहे; असे मत सामाजिक कार्यकर्ते मंगेश खंदारे यांनी व्यक्त केले.

सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ डीजे लावतात त्याचा त्रास हा लहान मुले, आजारी व्यक्ती व वृध्द व्यक्तींना त्रास होता. गणपती मिरवणुकीत माता, बघिनी येत असतात; त्यांना त्रास होईल असे वर्तन करू नये. यापेक्षा रक्तदान शिबिर, लहान मुलांचे खेळ, व्याख्याने असे कार्यक्रम आयोजित करावेत. यामध्ये आपल्या तालुक्यातील साखरवाडी व आपल्या जिल्ह्यातील भुईंज हे मोठे उदाहरण आहे; असे मत माजी प्राचार्य रवींद्र येवले यांनी व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!