स्थैर्य, सातारा, दि.२१: कोरोना सारख्या महामारीच्या काळात गर्दी करून जमाव जमवून मृत्यूचे कारण बनवून लाखो वारकर्यांच्या जीवाशी खेळा अशी वारकरी संप्रदाय अथवा वारकरी संतांची शिकवणच नाही. असे असताना पंढरपूरला जाण्यासाठी आषाढी वारीला परवानगी द्या अशी मागणी करणे म्हणजे लाखो वारकर्यांच्या व कष्टकर्यांच्या, शेतकर्यांच्या आरोग्याशी खेळणे होईल. वारीला परवानगी द्या अशी मागणी करणार्यांना प्रेतवाहिनी चंद्रभागा करायची आहे का? असा सवाल विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्रच्यावतीने करण्यात आला आहे.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रच्यावतीने कार्याध्यक्ष तसेच बडवे उत्पात आंदोलनातील प्रमुख नेते कॉ. धनाजी गुरव आणि उपाध्यक्ष व वारी समतेची या पुस्तकाचे लेखक विजय मांडके यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आठरापगड जातीतील बहुजन समाजातील वारकरी संतांना ज्या प्रवृत्तींनी छळले त्याच प्रवृत्तीचे काही मूठभर लोक आज वारीला परवानगी द्या अशी मागणी करत आहेत. कोरोनासारख्या महामारीच्या काळात यांना वारकरी, वारकरी संत आणि पंढरीची वारी आठवू लागली आहे. वास्तविक वारकरी संप्रदायात त्यांना कवडीचीही किंमत नाही हे त्यांनी ध्यानात घ्यावे. भगवा तुक्याचा आणि बामणी कावा संघाचा हे आता सर्वांना कळून चुकले आहे म्हणूनच आता वारी ला परवानगी द्या म्हणणारे जे कुणी आहेत त्यांना वारकर्यांच्या आरोग्याची काही देणे घेणे नाही असेच वाटते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना त्यांना साथीच्या रोगात ढकलण्याचा त्यांचा डाव आहे असेच म्हणावे लागेल. कारण कोरोनाचा हा संसर्ग वारी सुरू झाल्यावर गावोगावी पोहोचेल आणि कोरोना सर्वदूर पोहोचल्यानंतर तो आटोक्यात आणणे कठीण होईल याची जाण वारीला परवानगी द्या म्हणणार्यांना नसावी याच्या इतके दुर्दैव नाही. कुंभमेळ्याला परवानगी दिल्यानंतर ज्याप्रमाणे त्या परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढला त्याच पद्धतीने वारीच्या मार्गावरही हा प्रसार होईल यात शंकाच नाही. त्यामुळे वारकरी आणि शेतकरी यांना जपणे महत्त्वाचे असल्याने आम्ही वारीला परवानगी देऊ नये याच विचाराचे आहोत. राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय वारकर्यांच्यादृष्टीने अतिशय योग्य आहे. कुंभमेळ्याच्यानंतर शववाहिनी गंगा पाहिली आता आम्ही प्रेतवाहिनी चंद्रभागा होऊ देणार नाही त्यामुळेच आमचा वारीला परवानगी देऊ नये यासाठी आग्रह कायम राहील असे पत्रकात कॉ. धनाजी गुरव व विजय मांडके यांनी ठामपणे म्हटले आहे.
जगद्गुरु तुकोबाराय संसर्गाच्या बाबतीत समाजाची फार काळजी घेत त्यांना प्रबोधित करताना म्हणतात की , ’ तुका म्हणे अन्न जिरो नेली माशी आपुलिया जैसी संसग’ म्हणजेच शरीर हे एक परमार्थाचे साधन आहे. त्याला दुःख न देता आरोग्य सांभाळत परमार्थ करणेच हिताचे आहे असे तुकोबारायांना वाटते. ‘ठायीच बैसोनी करा एक चित्त। आवडे अनंत आळवावा ॥ तुका म्हणे आम्हा एकांताचा वास । ब्रम्ही ब्रम्हरस सेवू सदा॥ न लगती सायास जावे वनांतरा । सुखे येतो घरा नारायण॥’ जगद्गुरु तुकोबारायांच्या या म्हणण्यानुसार एकांतात राहणे महत्त्वाचे आहे. शववाहिनी गंगा करणार्यांचे आता प्रेतवाहिनी चंद्रभागा करण्याचा वारी परंपरेशी संबंध नसलेल्यांचा डाव हाणून पाडलाच पाहिजे, असेही कॉ.धनाजी गुरव व विजय मांडके यांनी शेवटी म्हटले आहे.