स्थैर्य, फलटण, दि. ७ : फलटण तालुक्यातील बिनविरोध निवड झालेल्या तडवळे ग्रामपंचायत सदस्यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा देताना लोकांच्या अपेक्षा समजावून घेऊन त्याची पूर्तता करा, आम्ही सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना दिली.
फलटण तालुक्यातील ८० ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम सध्या सुरु असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत राजे गटाची तडवळे ग्रामपंचायत बिनविरोध झालेली आहे. या ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्यांनी महाराष्ट्र विधान परिषद सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील लक्ष्मी-विलास पॅलेस या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी या सर्वांसह गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्त्यांचे स्वागत करुन त्यांचे अभिनंदन करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी फलटणचे आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते.