दैनिक स्थैर्य । दि. १५ मे २०२३ । मुंबई । सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात १६ आमदारच नव्हे संपूर्ण सरकार अपात्र असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला असतानाही शिंदे, फडणवीस हे बेशरमपणे, निर्लज्जपणे निकाल हा आपल्या बाजूने लागल्याचे सांगत आहेत. हे संपूर्ण सरकारच बेकायदेशीर असल्याने पोलीस, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या सरकारचे आदेशदेखील पाळू नयेत, असे आवाहन संजय राऊत यांनी केले होते. यामुळे नाशिक पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राऊत हे नाशिकमध्ये आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. या त्यांच्या वक्तव्यावरून राऊत यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम ५०५ (१ब) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. सुरक्षा यंत्रणांना अशाप्रकारचे आवाहन करणे हा गुन्हा आहे. यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल आल्यानंतर दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेतली होती. राऊत यांना पोलीस समन्स पाठविणार आहेत. दरम्यान, राऊत यांचे वकील कायदेशीर बाबी तपासतील आणि त्याला उत्तरे देतील, असे सांगण्यात आले आहे.