
स्थैर्य, फलटण दि. २ : झिरपवाडी येथील बंद अवस्थेत असलेले रुग्णालय नव्याने शासनाच्यावतीनेच सुरु करण्यात यावे. हे रुग्णालय कुठल्याही खाजगी संस्थेला चालवण्यास देऊ नये, अशी विनंती भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्यांच्यावतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे. फलटण तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, अल्पसंख्याक सेलचे राज्य चिटणीस अनुप शहा, युवा नेते अभिजीत निंबाळकर, भटक्या विमुक्त जमाती सेलचे अध्यक्ष सुनील जाधव, किसान मोर्चा चे शहराध्यक्ष नितीन वाघ हे उपस्थित होते.
झिरपवाडी येथील ग्रामस्थांनी आठ एकर स्वमालकीची शेत जमीन शासनाला या रुग्णालयासाठी दिली. फलटण तालुक्यात चार साखर कारखाने व इतर अनेक कंपन्या असल्यामुळे अनेक मजूर, कामगार या ठिकाणी वास्तव्यास आहेत. सर्वांनाच खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणे परवडत नाही. त्यामुळे या रुग्णालयाची आवश्यकता आहे. मात्र जर हे रुग्णालय खाजगी तत्त्वावर चालवण्यास दिल्यास सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणचे उपचार परवडणार नाहीत. मोफत औषध उपचार न मिळाल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये हे रुग्णालय शासनानेच चालवावे, अशी आग्रही मागणी या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात केली आहे.
या रुग्णालयाबाबत सर्वसामान्य जनतेची देखील हीच भूमिका असून हे रुग्णालय खाजगी संस्थेस चालवण्यास दिल्यास या विरोधात भाजपाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.