स्थैर्य, श्री क्षेत्र आळंदी दि . 18 : सुख हे आत्मस्वरुपी आहे . या स्वरुपाच्या ठिकाणी जो रममाण होतो तोच हे सुख जाणतो . मानवाचे शरीर हे ब्रम्हानंदी रसाचे ओतीव पुतळे आहेत . माउलींनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मानवाला जीवन जगण्याची कला शिकविली आहे असे मत ह भ प योगेश महाराज गोसावी यांनी व्यक्त केले.
आषाढी वारीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी , श्री क्षेत्र आळंदी , महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ व माय एफएम इंडिया रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ” पालखी सोहळा पत्रकार संघ ” या फेसबुक पेजवर ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ निरुपण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . आज ( बुधवार ) पाचव्या दिवशी योगगर्भयोग या पाचव्या अध्यायावर श्री क्षेत्र पैठणचे ह भ प योगेश महाराज गोसावी यांनी चिंतन केले .
भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी| कृपा करी हरी तयावरी ||
या ओवीवर चिंतन करताना ह भ प गोसावी महाराज म्हणाले ,
संत एकनाथ महाराजांमुळेच आपल्याला ज्ञानोबाराय आणि ज्ञानेश्वरी कळाली. नाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी शोधाचे व ज्ञानेश्वरी शुद्धीकरणाचे कार्य करून आपल्या सर्वांवर फार मोठे उपकार केले आहेत. मी स्वत:ला धन्य समजतो की मी संत एकनाथ महाराजांच्या वंशात जन्माला आलो.त्यामुळे ज्ञानेश्वरीवर निरूपण करताना मला विषेश आनंद वाटतो.
ज्ञानेश्वरी समजण्यासाठी नाथ महाराजांचे एकनाथी भागवत अतिशय उपयुक्त ठरते.
ज्ञानेश्वरीचा पाचवा अध्याय हा सांसारिक मनुष्यासाठी पथदर्शक आहे , जणु ज्ञानोबाराय या अध्यायात एकनाथ महाराज व जगद्गुरु तुकोबाराय यांच्याच जीवनाच दर्शन घडवतात कारण सन्यास घेणे हे सर्वांना साधणारे नाही परंतु संसार व परमार्थ यांचा समन्वय संत एकनाथ महाराज व तुकोबाराय यांनी साधला
मार्ग दाउनी गेले आधी | दयानिधी संत ते ||
ज्ञानोबाराय पाचव्या अध्यायच्या सुरवातीलाच अर्जुनाने केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना सांगतात की कर्मसंन्यास व कर्मयोग हे दोन्ही मोक्षदायक आहे दोन्हीचे फळ सारखेच आहे परंतु कर्मसंन्यासापेक्षा कर्मयोग हा सोपा मार्ग आहे
जो कर्मयोगी कधीही कोणाचा द्वेष करत नाही तेव्हा कोणत्याही गोष्टीची इच्छा करत नाही अशा कर्मयोग्याला सन्यासी म्हणावे
आणि मी माझे ऐसी आठवण | विसरले जयाचे अंतःकरण | पार्था तो संन्यासी जाण | निरंतर ||
या ओवी मध्ये ज्ञानोबाराय संन्यासी कोणाला म्हणावे याची व्याख्या करतात. ज्याचा मी आणि माझे पणा गेला तो संन्यासी. मग तो गृहस्थ असला काय कींवा संन्याशी. त्याला गृहादिकाचा त्याग करायची गरज नाही.
मनुष्याच्या बाह्यावस्थेपेक्षा आंतर अवस्था फार महत्त्वाची आहे . कारण मनाची अवस्था ही बंध आणि मोक्षाला कारणीभूत ठरते
मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः |
कर्मयोगी देखील इतर मनुष्याप्रमाणे कर्म करत असतो परंतु कर्म फळा बद्दल आसक्ती त्याला नसते. ज्याप्रमाणे कमळाचे पान पाण्यात असुनही भिजत नाही त्याप्रमाणे तो कर्म करत असुनही कर्मबंधात अडकत नाही.फलासक्ति टाकुन केलेलं कर्माने चित्तशुद्धी होते.
परमात्मज्ञानाने अज्ञानाचा नाश होतो .हे ब्रम्हज्ञान केवळ शुध्द अंतःकरणात प्रगट होते.
बुद्धी निश्चये आत्मज्ञान ब्रम्हरूप | भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण | तत्परायन अहर्निशी ||
या ओवी मध्ये ज्ञानेश्वर महाराज निष्काम कर्मयोग्याला ब्रम्हज्ञान प्राप्ती कशी होते हे सांगतात बुद्धिच्या निश्चयाने आत्मज्ञान प्राप्त होते व तो ब्रम्हस्वरूपात रात्रंदिवस तल्लीन असतो सर्वामध्ये त्याला ब्रम्हाची अनुभुती येते.
तो स्वत: परब्रह्म होतो .प्रिय वस्तुप्राप्त झाल्यास तो हर्षित होत नाही व अप्रिय वस्तु प्राप्त झाल्यास तो दुःखी होत नाही. त्याची बुद्धी स्थिर असते
विठ्ठल लावियेले पिसे | जिकडे पाहावे तिकडे दिसे ||
विषयामध्ये सुख आहे हि केवळ मृगजळासारखी कल्पना
विषयामध्ये सुख लेश मात्रही नाही सुखाचा केवळ आभास आहे. विषयांमध्ये सुख मानणार्यांना ज्ञानोबाराय मूर्ख म्हणतात. यासाठी ज्ञानोबाराय वेगवेगळी उदाहरणे देतात म्हणून विषय भोगी जे सुख | ते साद्यंतचि जाण दुःख परी काय करिती मूर्ख | न सेविता न सरे ||
माणूस विषयांमध्ये सुखाची सुख शोधतो परंतु विषयांमध्ये ते नसल्यामुळे किंवा विषयांमध्ये दुःख असल्यामुळे त्यांना दुःख भोगावे लागते आणि परिणामी सुखप्राप्ती होत नाही म्हणून सुख कशात आहे तर सुख हे आत्मस्वरूपी आहे.
थोडक्यात ज्ञानोबाराय सांसारीक मनुष्याला जीवन जगण्याची कला शिकवतात . या कार्यक्रमाचे निवेदन ह भ प स्वामीराज महाराज भिसे यांनी केले .
आज कापशीकरांचे निरूपण
आज गुरुवार दि . १८ रोजी सायंकाळी ४ वाजता पालखी सोहळा पत्रकार संघ या फेसबुक पेजवर पुण्याचे ह भ प निरंजननाथ उर्फ स्वप्नील कापशीकर हे आत्मसंयमयोग या पाचव्या अध्यायाचे निरुपण करतील .
माऊलींची पहाटपूजा
दरम्यान आज ( बुधवार ) पहाटे माऊलींच्या पादुकांची पूजा , अभिषेक व आरती पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई यांच्या हस्ते करण्यात आली . पुजेचे पौरोहित्य यज्ञेश्वर जोशी व राहूल जोशी यांनी केले . दुपारी जामकरकरांच्या वतीने , रात्री वालूरकरांच्या वतीने किर्तनाची तर हैबतबाबांच्या वतीने जागराची सेवा करण्यात आली .