
दैनिक स्थैर्य । दि. 10 मार्च 2022 । सातारा । आपल्या पुर्वानुभवाच्या आणि तंत्रज्ञान कौशल्याच्या जोरावर प्रगतीचे शिखर गाठण्याची जिद्द प्रतिक धुळेकर व विवेक मनुकर या ध्येयवादी तरूणांच्या अंगी आहे. त्यामुळे आपल्या गुणवत्तेच्या बळावर ‘डीएम बिझ जाहिरातीच्या क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करेल, असा विश्वास प्रसिध्द वक्ते प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी व्यक्त केला.
सातारा येथील डीएम बिझ डिजिटल मार्केटिंग एजन्सी या फर्मचे रविवार पेठेत प्रशस्त जागेत स्थलांतर करण्यात आले. या नवीन जागेतील कार्यालयाचा शुभारंभ प्राचार्य डॉ. पाटणे, ‘प्रकृती’चे डॉ. सुयोग दांडेकर, सामाजिक कार्यकर्त्या ॲड. वर्षा देशपांडे, नगरसेवक विजय काटवटे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी डॉ. पाटणे बोलत होते. आजचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे, गतीचे आणि स्पर्धेचे आहे. डिजिटल क्षेत्रातही नवकल्पनांना आणि अभिनव सृजनशीलतेला प्रचंड संधी आहे. ग्राहकांना प्रभावित करण्यासाठी जाहिरातींची गरज असते. पण त्यासाठी सौंदर्यदृष्टीची आणि ज्ञानकौशल्याची आवश्यकता असते. ते कौशल्य या तरूणांकडे असून त्यांना उत्तुंग यश मिळविण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.
आपले काम लाखो लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याची ताकद डिजिटल मार्केटिंगमध्ये सामावली आहे. प्रतिक व विवेकच्या माध्यमातून त्याचा अनुभव आपण घेतला असल्याचे सांगत डॉ. सुयोग दांडेकर यांनी डीएम बिझला शुभेच्छा दिल्या.
पुण्यामुंबईच्या मोहात न पडता आपल्या गुणवत्तेचा उपयोग आपल्या परिसराला व्हावा या भावनेतून या तरूणांनी हे आव्हान स्वीकारले आहे. त्यांच्यामुळे आजच्या काळातील आधुनिक सेवा सातारकरांना प्राप्त होत आहे ही कौतुकास्पद बाब असल्याचे ॲड. वर्षा देशपांडे यावेळी म्हणाल्या. नगरसेवक विजय काटवटे यांनीही डिजिटल मार्केटिंगचे महत्त्व विशद करून या उपक्रमास शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमास पत्रकार गजानन चेणगे, चित्रपट महामंडळाचे महेश देशपांडे, दुंदचे केंद्रप्रमुख अशोक मनुकर, संगीता मनुकर, विकास आणि मंगल धुळेकर, सारिका चेणगे, आझाद हिंदचे राजेश मोरे, वनमाला मनुकर, विनायक आणि शैलजा कदम यांची उपस्थिती होती.