दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑक्टोबर २०२१ | सातारा | राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले बहुउदेशीय संस्था आणि नारीशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार दि. २१ पासून पुष्कर मंगल कार्यालयात दिवाळी खरेदी आणि खाद्य जत्रा या प्रदर्शनाचे आयोजिन करण्यात आले आहे. फेडरेशनच्या अध्यक्षा श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी ११ वाजता या प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे, अशी माहितीनारीशक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा सुनिशा शहा यांनी दिली.
कोविडच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षात अडचणीत आलेल्या उद्योजक, व्यावसायिका, महिला बचत गट तसेच घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी दिवाळीच्या निमित्ताने एकाच छताखाली आणण्याचा उपक्रम सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला आहे. या प्रदर्शनात जिल्ह्यातील विविध महिलांनी स्वतः बनविलेल्या हॅन्डमेड पर्स, वस्तू, पणत्या, फराळाचे पदार्थ, कपडे, साड्या, विविध प्रकारची ज्वेलरी, आकाशदिवे, मसाले, पापड, लोणची, विविध शाकाहारी- मांसाहारी खाद्यपदार्थ व अजून बरेच काही विक्रीसाठी उपलब्ध करणार आहेत. तसेच बऱ्याच नवीन कलाकृती पाहायला व खरेदी करायला मिळणार आहे.
हे प्रदर्शन २१, २२, २३, २४ ऑक्टोबर अशा चार दिवशी रोज सकाळी १० ते रात्री १० असे सुरू राहणार आहे. प्रदर्शनासाठी प्रवेश विनामूल्य आहे. शहर तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी प्रदर्शनास सहकुटुंब, सहपरिवार भेट द्यावी असे आवाहन गीता भागवत यांनी केले आहे.