दैनिक स्थैर्य । दि.१८ नोव्हेंबर २०२१ । सातारा । सातारा जिल्हा पोलिस दलातील निलेश गौतम बच्छाव (रा. बसापा पेठ, सातारा) या अवघ्या २९ वर्षीय पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. काल पीटी परेड झाल्यानंतर त्यांना छातीत दुखू लागल्याने खासगी रुग्णालामध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान, अवघ्या दीड वर्षापूर्वी त्यांचा विवाह झालेला आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, निलेश बच्छाव हे काल नेहमीप्रमाणे पोलिस कवायत मैदानावर पीटी परेड करण्यासाठी पहाटे ६ वाजता गेले होते. सकाळी ८ वाजता परेड झाल्यानंतर त्यांना छातीत दुखू लागले. यामुळे उपचारासाठी त्यांना साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना आज त्यांचे निधन झाले. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर कुटुंबियांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.
दरम्यान, आतापर्यंत त्यांनी पोलिस मुख्यालय, बॉडीगार्ड म्हणून सेवा बजावली आहे. सध्या ते दहशतवादी विरोधी पथकामध्ये (एटीसी) पथकामध्ये गेल्या ३ वर्षापासून सेवा बजावत होते. निलेश यांचे दीड वर्षापूर्वी लग्न झालेले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील असा परिवार आहे. या घटनेने सातारा पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे.