दैनिक स्थैर्य । दि. ३० जुलै २०२२ । फलटण । मौजे सासकल ता. फलटण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी घरामधील टाकाऊ इलेक्ट्रिकल साहित्यापासून ब्ल्यू टूथ सूविधेसह डिजे व ध्वनीक्षेपकाची निर्मिती केली आहे. या विद्यार्थ्यांनी घरातील जुन्या मोबाईलचे टाकून दिलेले चार्जर,चार्जिंग होणाऱ्या विजेरीमधील बॅटरीज,मोटर, जुनी विद्युत सर्किट, मॅग्नेटसह साऊंड, टाकून दिलेली जुनी वायरिंग व जुने टाकाऊ डेक वापर करून ध्वनीक्षेपणाची निर्मिती केली आहे. यामध्ये ब्लूटूथ सुविधेसह माईक सिस्टीम सुद्धा बनवले आहे. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या ध्वनीक्षेपकाच्या मदतीने शाळेचा परिपाठ, विद्यार्थ्यांना भाषा व गणिताचे अध्यापन, देशभक्तीपर गीते, पाढे, कविता यासाठी त्याचा उपयोग होत आहे. हा ध्वनिक्षेपक इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी बनवला.त्यात वेदांत निलेश मदने, अथर्व भास्कर मदने, सार्थक संजय घोरपडे, सुमेध किशोर घोरपडे यांचा समावेश होता. शाळेचे मुख्याध्यापक जालिंदर बल्लाळ, शिक्षक पांडुरंग निकाळजे सर, रूपाली शिंदे मॅडम, सुधीर डालपे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विद्यार्थ्यांना सुरक्षेची काळजी घेऊन ध्वनीक्षेपक बनवण्यासाठी संधी दिली व मार्गदर्शन केले.
फलटण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पठाण मॅडम, शिक्षण विस्तार अधिकारी मठपती सर, दुधेबावी केंद्राचे केंद्रप्रमुख राजकुमार रणवरे सर, सासकल गावच्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी, पालक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे व त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.