स्थैर्य,अमरावती, दि.१५: जिल्हा सामान्य रुग्णालयात फिटनेस सर्टिफिकेट मिळवून देण्याच्या नावावर दलालांनी सर्वसामान्यांसह कर्मचाऱ्यांची लुबाडणूक चालविली आहे. मात्र, याबाबत तक्रारी होऊनही संबंधित दलालांवर थातूरमातूर कारवाई सोडण्यात येत असल्याने प्रशासनाला नाहक बदनामीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात दलालराज अनेक दिवसांपासून सुरू आहे. अशा अनेक घटना घडल्याचा पुरावादेखील लोकमतने गोळा केले आहेत. त्यापैकी एक घटना सोमवारी उघडकीस आली.
एका महिलेला त्वचेवर अंगभर पांढरे डाग पडल्याने त्या त्वचेसंदर्भात फिटनेस सर्टिफिकेट मिळण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात आल्या. त्या काऊंटरजवळ जाऊन सदर कर्मचाऱ्याला फिटनेस सर्टिफिकेटसंदर्भात विचार केली असता, बाजूलाच बसलेल्या निखिल वाळवे नामक युवकाने त्यांना आर्थिक मोबदला घेऊन सदर सर्टिफिकेट मिळवून देण्याची कबुली दिली. २ हजार ५०० रुपये सदर महिलेकडून उकळले. मात्र, सर्टिफिकेट मिळवून न देता गायब झाला. त्रस्त झालेल्या महिलेने सोमवारी १२.३० वाजता दरम्यान तिच्या मुलीला व जावयाला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. सदर व्यक्तीचा शोध घेतला नि त्याला पैसे देण्याची मागणी केली. तेव्हादेखील तो भूल पाडण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, जावयाला घाबरून त्याने दुसऱ्यांकडून उधारीवर १४०० रुपये आणून सदर महिलेला दिले. उर्वरित ११०० रुपये देण्याची कबुली त्याने पोलिसांसमक्ष दिली.
दुसरी घटना : एक विद्यार्थी फिटनेस सर्टिफिकेट मिळविण्याकरिता आला असता, तेथीलच एका अन्य दलालाने ते मिळवून देण्याचे २५० रुपये सांगून ३०० रुपये उकळले. सदर विद्यार्थ्याला त्या दलालाने आधी २०० रुपये साहेबांचे आणि ५० रुपये माझी मजुरी, असे सांगितले. मात्र, सर्टिफिकेट विद्यार्थ्याने ५०० रुपयांची नोट दिली असता, ३०० रुपये घेतले. विनवणी केल्यानंतरही त्याने ५० रुपये परत दिले नसल्याची घटनादेखील सोमवारीच घडली.
तिसरी घटना मोर्शी तालुक्यातील एका महिलेला फिटनेस सर्टिफेकेटसंदर्भात निखिल वाळवे याने २ हजार रुपये घेतले. सर्टिफिकेट न दिल्याने विचारणा केली असता सदर महिलेला व तिच्या पतीलासुद्धा दलालाने मारहाण केली होती. या घटनेची तक्रारीदेखील सिटी कोतवाली पोलिसांत करण्यात आली. पोलिसांनी त्या दलाला अटक केली नि सायंकाळी त्याच्या वडिलाने सोडवून आणल्याची माहिती तेथील अपंग युनियनचे अध्यक्ष गणेश टापरे यांनी दिली.
पाच दलालांचा सतत वावर
जिल्हा सामान्य रुग्णालयात पाच दलालांचा वावर असल्याची माहिती आहे. तेथे रुग्णांसह अन्य कामानिमित्त येणार्यांची ते वाटच बघत राहतात. अनोळखी व्यक्तींकडून ते काम करून देण्याचे आगाऊ पैसे उकळतात. यावर जिल्हा शल्यचिकित्सकांनी आक्रमक होऊन सदर व्यक्तींची लेखी तक्रार दिल्यास कारवाई करण्याचे आश्वास दिले. तसेच अशा लोकांच्या आमिषासा बळी पडू नका, असे आवाहनदेखील त्यांनी केले.
फिटनेस वा अन्य कुठल्याही सर्टिफिकेटकरिता तपासणी शुल्क १५० रुपये आणि प्रमाणपत्राचे १०० रुपये आकारले जातात. त्याव्यतिरिक्त आगाऊ शुल्क कुणीही देऊ नये, मागणार्याची थेट माझ्याकडे तक्रार दिल्यास संबंधितावर कठोर कारवाई करेन. याबाबच पूर्वी पोलिसांत तक्रारी दिल्या आहेत.