दैनिक स्थैर्य | दि. 28 नोव्हेंबर 2023 | सातारा | यंदाच्या हंगामात ऊस दरावरुन पश्चिम महाराष्ट्रात रान पेटले आहेत. शेतकरी संघटनांनी ऊस दरासाठी आंदोलने सुरु केले आहे. त्या पार्श्वभूमीवर ऊस दराबाबत निर्णय घेण्यासाठी शेतकरी संघटना, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी यांची गुरुवारी (दि. ३०) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी बैठक बोलावली आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरु झाला आहे. मात्र, अद्यापही कारखान्यांनी ऊसाचा दर जाहीर केला नाही. पश्चिम महाराष्ट्रातही अशीच स्थिती असून, विविध संघटनांनी आंदोलने सुरु केली आहे. सातारा जिल्ह्यात शेतकरी संघटना आणि साखर कारखान्यांनी समन्वयाने ऊस दर ठरवावा, यासाठी जिल्हाधिकारी डूडी यांनी बैठक बोलावली आहे.
सर्व साखर कारखान्यांचे चेअरमन, कार्यकारी संचालक तसेच विविध शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीस नियंत्रण दिले आहेत. ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात होणार आहे. त्याबाबतचे पत्र निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिले आहे.