विकासाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा – मी शिवसेनेतच असल्याचा जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांचा दावा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २९ जुलै २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यातील विकासाच्या मुद्द्यावर जिल्ह्याचे भूमिपुत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात शिवसेना सर्वत्र वाढविण्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशी ठाम ग्वाही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली मी शिवसेनेतच असून माझी कोणावरही नाराजी नाही असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले शिवसेना हा पक्ष आदेशावर चालतो. शिवसेनेमध्ये दुहीचे राजकारण रंगवले जात आहे असे काही नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातील ज्या दोन गटाच्या बातम्या येत आहेत त्या संदर्भातील वातावरण लवकरच निवळेल आणि योग्य वेळ आल्यावर सर्व काही ठीक होईल. सातारा जिल्ह्यात विकास व्हावा सातारा जिल्ह्याला आयटी पार्क तसेच जिल्ह्यातील औद्योगिक विकास महामंडळाचा विस्तार होऊन नवीन कंपन्या येथे याव्यात, स्थानिकांना रोजगार मिळावा याशिवाय नामांकीत शिक्षण संस्था येथे येऊन त्यांनी शिक्षणाचा पाया बळकट करावा या विकासाच्या मुद्द्यावरच मी एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

फलटण माण खटाव येथील 30 ते 35 तालुका प्रमुख शहर प्रमुख व उपशहर प्रमुख यांनी माझ्या समवेत शिंदे गटाला पाठिंबा जाहीर करून शिवसेना जिल्ह्यात मजबूत करण्याचे धोरण निश्चित केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसा आम्हाला आदेश दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व व हिंदुहृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे निवासस्थान मातोश्री हे आम्हाला कायमच वंदनीय आहे. त्यांनी वेळप्रसंगी अगदी मातोश्री झाडायला जरी लावली तरी मला कमीपणा वाटणार नाही. जे काही समज गैरसमज आहेत ते वरिष्ठ पातळीवर असून त्यातील बऱ्याच या बाबी न्यायप्रविष्ट आहेत. इतक्या उच्च श्रेणीतला कार्यकर्ता मी नाही पण जिल्हापातळीवर शिवसेना मजबूत करण्याचा माझा अखंड प्रयत्न सुरूच राहील असे चंद्रकांत जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!