जिल्हा बँक निवडणूकीत दिग्गजांना दणका; ना.शंभूराज देसाई, आ.शशिकांत शिंदे पराभूत; शेखर गोरे, सुनिल खत्रींना नशिबाची साथ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. 23 नोव्हेंबर 2021 । सातारा । सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी समजल्या जाणार्‍या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीत राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई, आमदार शशिकांत शिंदे या दिग्गजांचा पराभव झाला तर दुसरीकडे राज्याचे सहकारमंत्री ना.बाळासाहेब पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचे विजय लक्षवेधी ठरले. माणचे शेखर गोरे, सुनिल खत्री हे दोन नेते चिठ्ठीद्वारे विजयी होत नशिबवान ठरल्याचे पहायला मिळाले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, अनिल देसाई हे दिग्गज नेते बिनविरोध होवून सेफ झोन मध्ये गेले होते. तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे या बड्या नेत्यांनी निवडणूकीतून माघार घेत बँकेच्या राजकारणापासून दूर राहणेच पसंत केले होते. मात्र निवडणूकीच्या रणांगणात ना.बाळासाहेब पाटील, ना.शंभूराज देसाई, आ.शशिकांत शिंदे, सत्यजीत पाटणकर, उदयसिंह पाटील, शेखर गोरे, प्रभाकर घार्गे, मनोजकुमार पोळ असे जिल्ह्याच्या राजकारणातील प्रमुख चेहरे उभे ठाकल्याने निवडणूकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते.

आमदार शशिकांत शिंदेंचा एका मताने पराभव

प्राथमिक कृषी पतपुरवठा विभागातील जावली मतदारसंघातून निवडणूक लढवणार्‍या आमदार शशिकांत शिंदे यांचा एका मताने पराभव झाला. 49 मतांपैकी आमदार शिंदे यांना 24 मते मिळाली तर ज्ञानदेव रांजणे यांनी 25 मते मिळवत विजय नोंदवला.

ना.शंभूराजे देसाई 14 मतांनी पराभूत

राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचा त्यांचे पारंपारिक विरोधक सत्यजितसिंह पाटणकर यांनी पाटण प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघातून 14 मतांनी पराभव केला. शंभूराज देसाई यांना 44 तर सत्यजितसिंह पाटणकर यांना 58 मते मिळाली.

सहकार मंत्री ना.बाळासाहेब पाटील 8 मतांनी विजयी

कराड प्राथमिककृषी पतपुरवठा मतदारसंघातून झालेल्या निवडणूकीत राज्याचे सहकारमंत्री ना.बाळासाहेब पाटील 8 मतांनी विजयी झाले. ना.पाटील यांना 140 पैकी 74 मते मिळाली तर त्यांचे विरोधी उमेदवार उदयसिंह पाटील यांना 66 मतांवर समाधान मानावे लागले.

प्रभाकर घार्गेंचा लक्षवेधक विजय

माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी राष्ट्रवादी प्रणित उमेदवार नंदकुमार मोरे यांचा खटाव प्राथमिककृषि पतपुरवठा मतदार संघातून पराभव करुन लक्षवेधक विजय मिळवला. घार्गे यांना 56 तर मोरे यांना 46 मते मिळाली. प्रभाकर घार्गे यांचा राष्ट्रवादीवर हा मोठा विजय मानला जात आहे.

शेखर गोरे व सुनिल खत्री ठरले नशिबवान

कोरेगाव आणि माण प्राथमिक कृषी पतपुरवठा गटातील उमेदवारांना समान मते मिळाल्याने या ठिकाणचा निकाल चिठ्ठीद्वारे घोषित करण्यात आला. कोरेगावमध्ये सुनील खत्री आणि शिवाजीराव महाडिक यांना प्रत्येकी 45 मते मिळाली होती. तर माणचे शेखर गोरे आणि मनोज पोळ यांना प्रत्येकी 36 मते मिळाली. त्यानंतर काढण्यात आलेल्या चिठ्ठ्यांमधून शेखर गोरे व सुनिल खत्री यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने हे दोन्ही उमेदवार नशिबवान संचालक ठरले.

फलटणच्या श्रीमती शारदादेवी कदमांनी घेतली लक्षवेधक मते

माजी आमदार कै.चिमणराव कदम यांच्या पत्नी श्रीमती शारदादेवी कदम या देखील सातारा जिल्हा बँकेच्या निवडणूकीत महिला प्रतिनिधी मतदारसंघातून उतरल्या होत्या. महिला प्रतिनिधीसाठी झालेल्या चौरंगी लढतीत त्यांनी तब्बल 618 इतकी मते मिळवली. या मतदारसंघातून वाठार (ता.कराड) येथील ऋतुजा पाटील व देगाव (ता.सातारा) येथील कांचन साळुंखे विजयी झाल्या.

जिल्हा बँक निवडणूकीतील मतदारसंघ निहाय नवनिर्वाचित संचालक याप्रमाणे –

प्राथमिक कृषी पतपुरवठा वि.का.स.सेवा सहकारी संस्था व धान्य अधिकोष सहकारी संस्था –

1) सातारा – श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे अभयसिंहराजे भोसले, रा.सातारा. (बिनविरोध)

2) जावली – ज्ञानदेव किसन रांजणे, रा.आंबेघर, ता.जावली.

3) महाबळेश्‍वर – राजेंद्र निवृत्ती राजपुरे, रा.राजपुरी, ता.महाबळेश्‍वर. (बिनविरोध)

4) कराड – ना.शामराव उर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील, रा.कराड, जि.सातारा.

5) पाटण – सत्यजित विक्रमसिंह पाटणकर, रा.पाटण, जि.सातारा.

6) कोरेगाव – सुनिल रवेलचंद खत्री, रा.कोरेगाव, जि.सातारा.

7) खटाव – प्रभाकर देवबा घार्गे, रा.पळशी, ता.खटाव.

8) माण – शेखर भगवानराव गोरे, रा.दहिवडी, ता.माण.

9) खंडाळा – दत्तात्रय नारायण ढमाळ, रा.असवली, ता.खंडाळा. (बिनविरोध)

10) फलटण – ना.श्रीमंत रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर, रा.फलटण, जि.सातारा. (बिनविरोध)

11) वाई – नितीन लक्ष्मणराव जाधव (पाटील), रा. बोपेगाव, ता. वाई, जि. सातारा. (बिनविरोध)

अ) महिला प्रतिनिधी –

1) ऋतुजा राजेश पाटील, रा.वाठार, ता.कराड.

2) कांचन सतिश साळुंखे, रा.देगाव, ता.सातारा.

ब) अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीतील सदस्य –

1) सुरेश बापू सावंत, रा.सावंतवाडी, ता.सातारा. (बिनविरोध)

क) इतर मागासवर्गीय प्रवर्ग –

1) प्रदीप बापुसो विधाते, रा.खटाव, जि.सातारा.

ड) विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्गीय सदस्य –

1) लहुराज गणपती जाधव, रा.मसूर, ता.कराड. (बिनविरोध)

कृषी पणन संस्था व प्रक्रिया संस्था अ) खरेदी विक्री संघ (तालुका व जिल्हा खरेदी विक्री संघ) –

1) मकरंद लक्ष्मणराव जाधव (पाटील), रा.बोपेगाव, ता.वाई. (बिनविरोध)

कृषी पणन संस्था व प्रक्रिया संस्था ब) कृषि उत्पादन प्रक्रिया सहकारी संस्था (सहकारी साखर कारखाने / ऑईल मिल्स / सुतगिरण्या) –

1) श्रीमंत शिवरुपराजे यशवंतराव निंबाळकर (खर्डेकर), रा.आसू, ता.फलटण. (बिनविरोध)

नागरी बँका / नागरी सहकारी पतपेढ्या / ग्रामीण बिगरशेती संस्था / पगारदार नोकरांच्या पतसंस्था यांचे प्रतिनिधीत्व करणारे –

1) रामराव आनंदराव लेंभे, रा.पिंपोडे बु., ता.कोरेगाव.

अ) गृहनिर्माण सहकारी संस्था व दुध उत्पादक संस्था, पशु पैदास / वराह पालन / कुक्कुटपालन / शेळी – मेंढी पालन संस्था इत्यादी –

1) श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले – रा.सातारा. (बिनविरोध)

ब) औद्योगिक / विणकर व मजुर सहकारी संस्था / ग्राहक संस्था / पाणी पुरवठा सहकारी संस्था / इतर प्रकारचे संस्थांचे प्रतिनिधी करणारे –

1) अनिल शिवाजीराव देसाई – रा.वरकुटे मलवडी, ता.माण. (बिनविरोध)


Back to top button
Don`t copy text!