जिल्हा वार्षिक योजनेचा 349.87 कोटी रुपयांचा आराखडा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सोलापूर, दि. 23: जिल्हा वार्षिक योजनेच्या सन 2021-22 साठीच्या 349.87 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास आज मान्यता देण्यात आली. जिल्ह्याच्या प्राधान्याच्या योजना लक्षात घेऊन वार्षिक योजनेसाठी 95 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी केली जाणार असल्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सांगितले.

पालकमंत्री श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. जिल्हा नियोजन भवनमध्ये झालेल्या या बैठकीस व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, खासदार ओमराजे निंबाळकर, रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे उपस्थित होते.

श्री. भरणे यांनी सांगितले की,सन 2021-22 च्या आराखड्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी यंत्रणाकडून 802.53 कोटी रुपयांची मागणी आली होती. जिल्हा नियोजन समितीने 349.87 कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी दिली. अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 181.82 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र 151.67 कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनांसाठी 4.15 कोटी रुपयांच्या  आराखड्यास मान्यता देण्यात आली.

जिल्ह्यातील प्राधान्याच्या सर्वसाधारण योजनेसाठी 95 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी केली जाणार आहे. उपमुख्य मंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत ही अधिकची मागणी केली जाईल, असे श्री. भरणे यांनी सांगितले.

राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निधी वितरणासाठी काही निर्बंध घातले होते मात्र आता 2020-21 साठीचा जिल्हा नियोजन समितीचा पूर्ण निधी उपलब्ध झाला आहे. या निधीच्या खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत पुढाकार घेवून काम करावे आणि विकासकामे वेळेत पुर्ण करावीत असे श्री. भरणे यांनी सांगितले.

बैठकीत जिल्हा परिषदेच्या सोलापूर शहरातील शाळांचे महानगरपालिकेकडे हस्तांतरण, पालखी मार्गावरील शाळांच्या पुनर्बांधणी, कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती, राष्ट्रीयकृत बॅकामार्फत कर्ज वितरण आदी मुद्यांवर चर्चा झाली.

बैठकीस सर्वश्री आमदार बबनराव शिंदे, सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, राजेंद्र राऊत, शहाजीबापू पाटील, संजय शिंदे, प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते पाटील, राम सातपुते, सचिन कल्याणशेट्टी, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह समितीचे सदस्य, पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.

कोरोना काळात निधन झालेले जेऊरवाडी ग्रामपंचायतीचे शिपाई गणपत जाधव यांची पत्नी सुरताबाई जाधव व मुलगा रमेश जाधव यांना पालकमंत्री श्री. भरणे यांच्या हस्ते 50 लाखांच्या निधीचा धनादेश देण्यात आला.

 नियोजन समिती बैठकीत मान्यता दिलेल्या सन 2021-22 च्या प्रारुप आराखड्याचा तपशिल (रुपये कोटीमध्ये)

अ.क्र. बाब यंत्रणाची मागणी मान्यता दिलेला आराखडा
1. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 802.53 349.87
2. अनुसुचित जाती उपयोजना 181.82 151.67
3. आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना 4.15 4.15
  एकूण 988.50 505.69

 


Back to top button
Don`t copy text!