फलटणच्या पत्रकारांना ‘दर्पण’ पुरस्काराचा सन्मान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ०७ जानेवारी २०२४ | फलटण | पोंभुर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे देण्यात येणार्‍या 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण संपन्न झाले. या प्रतिष्ठित पुरस्कारांना मिळालेल्या फलटण येथील दोन पत्रकार, दैनिक गंधवार्ताचे संपादक ॲड. रोहित अहिवळे व दैनिक पुण्यनगरीचे फलटण तालुका प्रतिनिधी यशवंत खलाटे – पाटील, यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ होते. व्यासपीठावर मराठवाडा विभाग साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. जगदीश कदम, गडहिंग्लज येथील ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर, कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके, महाराष्ट्र राज्य अधिस्विकृती समितीचे सदस्य प्रकाश कुलथे, पोंभुर्ले गावच्या सरपंच सौ.प्रियांका धावडे, उपसरपंच सादीक डोंगरकर, अ‍ॅड.प्रसाद करंदीकर, सुधाकर जांभेकर यांची उपस्थिती होती.

राजाभाऊ लिमये यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांच्या अनुभवांबद्दल बोलताना सांगितले की “मी 50 हून अधिक वर्षे पत्रकारिता केली आहे, आणि आता निवृत्त झालोय. पण रविंद्र बेडकिहाळ यांच्याकडून सुरु असलेल्या बाळशास्त्री जांभेकरांच्या निष्ठापूर्वक स्मरण कार्याला मी सातत्याने मदत करत असतो.” त्यांनी पोंभुर्ले ही बाळशास्त्री जांभेकरांची जन्मभूमी असल्याने येथील स्मारक कार्यात राज्यातील सर्व पत्रकारांनी योगदान द्यावे, असे आवाहन केले.

रविंद्र बेडकिहाळ म्हणाले, “बाळशास्त्रींनी ब्रिटीश काळात ‘दर्पण’ या मराठी वृत्तपत्राची सुरुवात करण्याचे धाडसी काम केले. शिक्षण, सामाजिक, विज्ञान, पुरातत्त्व संशोधन, धर्मचिकित्सा आणि पत्रकारितेतून समाजजागरण असे काम जांभेकरांनी केले. आजच्या पत्रकारांनी त्यांचे काम समजून घेणे आवश्यक आहे.”

कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘दर्पण’ स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. बाळशास्त्रींची पालखी वाद्यांच्या गजरात स्मारकामध्ये आणण्यात आली व त्यानंतर दीपप्रज्वलन व बाळशास्त्रींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. सूत्रसंचालन विश्वस्त अमर शेंडे यांनी केले आणि आभार विजय मांडके यांनी मानले.

४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे

फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.

संपर्क : 8888006611 (WhatsApp)

कार्यक्रमास पुणे, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अहिल्यानगर, नांदेड आदी जिल्ह्यातील पत्रकारिता, साहित्य, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, माध्यमप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!