दैनिक स्थैर्य | दि. २ जून २०२३ | लोणंद |
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रातील सामाजिक तसेच महिला बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या कर्तबगार महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार ग्रामपंचायतीमार्फत देण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे. त्याच निर्णयाची अंमलबजावणी करत फलटण तालुक्यातील आरडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
या पुरस्काराच्या मानकरी सौ.सोनाली वरूण भोईटे व सौ.तनुजा किसन भोईटे या ठरल्या. दोघींनाही मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, ट्रॉफी, पुष्पगुच्छ देऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे वितरण आरडगाव ग्रामपंचातीच्या सरपंच रवींद्र शिर्के, उपसरपंच अरुणाताई भोईटे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भोईटे, विजय भोईटे, आदर्श ग्रामसेवक विठ्ठलराव सोनवलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
पुरस्काराच्या मानकरी सौ. सोनाली भोईटे या आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, हा पुरस्कार हा माझ्या एकटीचा नसून आपणा सर्वांचा आहे. यावर्षी हा पुरस्कार आम्हा दोघींना मिळाला. पुढच्या वर्षी हा पुरस्कार आणखी दुसर्या कोणाला मिळेल, यासाठी सामाजिक कार्यात अग्रेसर राहा, असे आवाहन त्यांनी कार्यक्रमास जमलेल्या असंख्य महिलांना केले.
कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या कार्यक्रमासाठी गावातील असंख्य महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.