दैनिक स्थैर्य | दि. ५ डिसेंबर २०२३ | फलटण |
सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांचा वाढदिवस दि. ३ डिसेंबर रोजी संपन्न झाला. वाढदिवस म्हटला की, हार-तुरे, मिठाई मोठ्या प्रमाणात देण्यात येते; परंतु या हार-तुर्यांवर खर्च करून त्याचा उपयोग काही होत नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या खर्चाला फाटा देऊन त्यांच्यावर प्रेम करणार्या लोकांना आवाहन केले की, त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुणीही हार-तुरे न आणता दिव्यांग बांधवांसाठी जे मदतीचे साहित्य लागते, ते त्यांना भेट म्हणून द्यावे. त्यांच्या आवाहनानुसार सातारकरांनी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये व्हीलचेअर, कमोड, श्रवण यंत्र तसेच इतर दिव्यांगांसाठी उपयुक्त साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये भेट दिले. पोलीस अधीक्षकांनी दिव्यांगांसाठी काम करणार्या संस्थांकडून दिव्यांग बांधवांसाठी कोणत्या साहित्याची गरज आहे याची यादी मागवली आणि लोकांकडून आलेल्या दिव्यांगांसाठीच्या साहित्याची भेट या दिव्यांग बांधवांना देण्यात आली.
अपंगांना केलेल्या साहित्य वाटपामुळे खर्या अर्थाने समीर शेख यांचा वाढदिवस सार्थकी लागलेला आहे. दिव्यांगांना कोणतेही कष्ट होऊ नये म्हणून त्यांनी पोलीस अधिकार्यांना दिव्यांगांसाठी जे साहित्य जमा झालेले आहेत ते त्यांच्या घरी जाऊन त्यांना सुपूर्द करावे, असे आदेश दिल्याने फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व त्यांचे सहकारी यांनी दिव्यांगांच्या घरी जाऊन कुरवली, विडणी, गोखळी या गावातील दिव्यांगांना व्हीलचेअर कमोड, श्रवण यंत्र यांचे वाटप केले आहे.