जागतिक पर्यावरण दिन : गणेश पवार यांचा निसर्ग संवर्धनासह पर्यावरणपुरक सामाजिक संदेश
स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक, दि.9 (रणजित लेंभे) : बिचुकले ता.कोरेगाव येथील शेतकरी कुटुंबातील गणेश कृष्णात पवार यांनी वडिलांच्या निधनानंतरच्या तेराव्याच्या कार्याला खांदकऱ्यानां टोपी, टावेल आणि वस्तू ऐवजी हातात आंब्याचे वृक्षरोप देऊन, वडिलांच्या स्मृती वृक्षरुपाने चिरंतन रहाव्यात या उद्देशाने तेराव्या दिवशी २५ आंब्याची रोपे वाटली.जुन्या प्रथेला विधायक व उदात्त हेतूची झालर देत निसर्ग संवर्धनासह एक सामाजिक संदेश दिला आहे.
पाणी फौंडेशन, जल व वृक्ष संवर्धन, पर्यावरणपुरक व विधायक उपक्रमात अग्रेसर असणारे बिचुकले गावं आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ श्रमदान मित्र समूहाचे सक्रिय सदस्य गणेश पवार यांचे वडील कै. कृष्णात निवृत्ती पवार यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या अंत्यविधी नंतर सावड व दशक्रिया विधी रितीरिवाजा प्रमाणे पार पडला. मात्र दि.५ जून रोजी वडिलांच्या तेराव्याच्या विधी व कार्याला दुखवटा व्यक्त करण्यासाठी त्यांच्या घरी आलेल्या खांदेकरी, भावकीतील मंडळी तसेच पाहूण्यांना विड्याबरोबर आंब्याची रोपे देऊन एक अभिनव व पर्यावरणपुरक प्रथा सुरु केली. वास्तविक पाहता अशा दु:खद प्रसंगी दुखवटा व्यक्त करताना संपुर्ण पोशाख वगैरे गोष्टी दिल्या जातात. त्याच प्रमाणे लोकं काय म्हणतील,समाज आणि भावकी अशा प्रकाराला समजून घेतील का त्यामुळे विशेषतः जुन्या प्रथांना बगल देण्याचे धाडस, धजावत नाही किंबहुना विचार कोणी करीत नाही. परंतु बिचुकले गावात गेली सात वर्ष विवीध समाजोपयोगी व पर्यावरणपुरक उपक्रम राबवणारे श्रमदान ग्रुपचे अध्यक्ष संभाजी पवार (आण्णा) यांच्या मार्गदर्शनानुसार गणेश यांनी आपल्या वडिलांची स्मृती वृक्षरुपाने चिरंतन रहावी या उद्देशाने तेराव्या दिवशी २५ आंब्याची रोपांचे वाटप करण्यात आले. योगायोग म्हणजे या दिवशी जागतिक पर्यावरण दिन होता. यामध्ये खांदेकरी व पाहुण्यांना व भावकी मंडळीना असणाऱ्यांना वृक्षरोप देण्यात आले. या अभिनव व इतरांसाठी अनुकरणीय उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यातून एकच की निसर्ग संवर्धन, व त्या मृत व्यक्तीची आठवण म्हणून भांड व इतर वस्तू देण्यापेक्षा झाड दिलं तर ते लोक जास्त आठवणीत ठेवतील, तसेच त्याची जोपासना करण्यासाठी अधिक लक्ष केंद्रित करतील हा मुख्य उद्देश श्री.पवार यांचे मत आहे.याप्रसंगी विनायक पवार , किरण पवार , विलास पवार , हेमंत जाधव , संदेश पवार , संतोष पवार इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
नवी मुंबई येथे खाजगी प्रॅक्टीस करणारे बिचुकले गावचे सुपुत्र डॉ. सुरेश पवार यांच्या मातोश्री कै. ताराबाई विनायक पवार (काकी) यांच्या स्मृतीदिनानिमित्त दरवर्षी आरोग्य शिबिराचे आयोजन करुन गावकऱ्यांना आरोग्य सेवा दिली जाते, यावेळी डॉ. अविनाश पोळ श्रमदान ग्रुपच्या वतीने अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप ग्रामस्थांना करण्यात आले आहे.
वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे.प्रत्येक ग्रामस्थांनी शाश्वत व चांगल्या गोष्टींचे अनुकरण केल्यास पर्यावरणाचा समतोल राहण्यास मदत होईल–गणेश पवार (बिचुकले ग्रामस्थ )