दैनिक स्थैर्य । दि.०१ फेब्रुवारी २०२२ । फलटण । बेस्ट पोलीस पाटील ऑफ द मंथ पुरस्कार शांताराम काळेल पाटील, दत्तात्रय सरक पाटील आणि बेस्ट पोलीस कर्मचारी ऑफ द मंथ पुरस्कार विलास यादव व दत्तात्रय कदम यांना सन्मानित करण्यात आले असून या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
भारतीय प्रजासत्ताकाच्या ७३ व्या वर्धापन दिनी दि. २६ जानेवारी रोजी येथील पोलीस परेड मैदानावर ध्वजारोहण कार्यक्रमानंतर प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांच्या हस्ते व उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या उपस्थितीत या चौघांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे उपस्थित होते.
सहाय्यक फौजदार विलास ज्ञानदेव यादव, पोलीस हवालदार दत्तात्रय धोंडीबा कदम यांना माहे डिसेंबर २०१९ मध्ये सर्वात जास्त प्रकरणांची निर्गती करुन सर्वसामान्य जनतेला लवकर न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले म्हणून बेस्ट पोलीस ऑफ द मंथ व भिलकटी गावचे पोलीस पाटील शांताराम विठ्ठल काळेल पाटील यांना २ समाजात निर्माण झालेला वाद मिटवून कायदा सुव्यवस्था परिस्थिती अबाधीत ठेवणे, अनोळखी चोरट्यांचा दुचाकी चोरण्याचा प्रयत्न हाणून पाडला, मिरगावचे पोलीस पाटील तथा फलटण तालुका पोलीस पाटील संघटनेचे कार्याध्यक्ष दत्तात्रय सरक पाटील यांनी पाण्यामध्ये पडलेली चारचाकी बाहेर काढण्यासाठी मदत केली तसेच ट्रकला लागलेली आग फायर ब्रिगेड बोलवून विझवली दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जिवीत हानी होऊ दिली नाही यासाठी हे पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील यांना काम करताना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या संकल्पनेतून प्रत्येक महिन्याला उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील यांच्या साठी हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. हा पुरस्कार गुन्ह्याची निर्गती करणे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न व्यवस्थितरीत्या हाताळणे, अपघातांमध्ये मदत करणे, गुन्हेगारी प्रवृत्तीस रोखणे, वाद मिटविणे अशा प्रकारे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील यांना प्रदान केला जातो.
पुरस्काराबद्दल प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, पोलीस पाटील संघटनेचे राजाध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, मार्गदर्शक अरविंद मेहता, संघटनेचे प. महाराष्ट्र उपाध्यक्ष हणमंतराव सोनवलकर पाटील, जिल्हाध्यक्ष प्रदीप (कैलास) गाढवे पाटील, तालुकाध्यक्ष अजित बोबडे पाटील यांनी पुरस्कार प्राप्त पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील यांचे अभिनंदन केले आहे.