दैनिक स्थैर्य | दि. ८ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
फलटण तालुयामध्ये १२६ गावांमध्ये १६१ रेशन धान्य दुकाने असून त्यामधील ३९४७२ पात्र लाभार्थी कुटुंबांना सोमवार, दि. ६ नोव्हेंबर २०२३ पासून दिवाळी सणानिमित्त आनंदाचा शिधा वाटप सुरू झाले आहे. यामध्ये एक लिटर तेल, एक किलो साखर, अर्धा किलो चणाडाळ, अर्धा किलो मैदा, अर्धा किलो रवा व अर्धा किलो पोहे असे एकूण सहा जिन्नस एका विशिष्ट प्रकारच्या कॅरिबॅगमध्ये भरून लाभार्थ्यांना केवळ १००/- रूपयांत उपलब्ध करून दिला जाणार आहे.
गौरी गणपती सणानिमित्त प्राप्त सर्वच्या सर्व ३९५३८ आनंदाचा शिधा किटचे वाटप लाभार्थ्यांना करून फलटण तालुका सातारा जिल्ह्यात आघाडीवर होता व सातारा जिल्हा संपूर्ण राज्यात यात आघाडीवर होता. तसेच याबाबत कोणत्याही लाभार्थ्यास कोणतीही तक्रार असल्यास त्यांनी फलटण येथे तहसील कार्यालयात तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, नायब तहसीलदार नामदेव काळे अथवा पुरवठा निरीक्षक मनोज काकडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.