
स्थैर्य, मुंबई, दि.२८: महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळासाठी शनिवारची संध्याकाळ खळबळ उडवून देणारी ठरली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते व मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यात अचानक झालेल्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. दोन्ही नेत्यांच्या भेटीने वेगवेगळ्या चर्चांचे पेव फुटले आहेत. या भेटीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, थोरात यांनी या भेटीला जास्त महत्त्व देवू नये, असेही म्हटले आहे.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन हे सरकार स्थापन केले आहे. राजकारणामध्ये इतर पक्षांच्या नेत्यांसोबत अशा भेटी होत असतात. दीपिका पदुकोणने चहा बिस्कीट खाल्ले अशा बातम्यांना जितके महत्त्व दिले जात आहे. तितकेच महत्त्व या भेटीला आहे. त्यामुळे या भेटीला माध्यमांनी फार महत्व देवू नये, असे थोरात म्हणाले.
तसेच, ‘शिवसेना ही भाजपसोबत अनेक वर्षांपासून सोबत होती. मागील सरकारमध्येही शिवसेना भाजपसोबत होती. मागील सरकारमध्ये पाच वर्षे कशी वागणूक भाजपने दिली हे त्यांना चांगलेच माहिती आहे’, अशी आठवणच थोरात यांनी सेनेला करून दिली. संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीमुळे कोणतेची समीकरण तयार होणार नाही. महाविकास आघाडी सरकारला कसला ही धोका नाही, असा दावाही थोरातांनी केला.
शिवसेनेने काँग्रेसला फसवले : निरुपम
फडवीस यांची राऊत यांनी अशा पद्धतीने भेट घेणे हे काँग्रेसला खटकले आहे. संजय निरुपम यांनी या भेटीवरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ही भेट म्हणजे शिवसेनेचा राजकीय व्याभिचार असल्याचे निरुपम यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर शिवसेना ही काँग्रेसची फसवणूक करत आहे, असा गंभीर आरोप देखील निरुपम यांनी केला आहे.
निरुपम यांनी सांगितले की, केंद्र सरकारने मांडलेल्या कृषी विधेयकाला संसदेच्या दोन्ही सभागृहात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कडाडून विरोध केला. मात्र, शिवसेना पक्ष प्रमुख आणि शिवसेनेच्या मंत्र्यांनी कृषी विधेयकाला पाठिंबा दिला. शिवसेनाची भूमिका कायम दिशाभूल करणारी आहे. काँग्रेसने आपला विचारधारा, धर्म, व्यवहार सर्वकाही सोडून सत्ता स्थापनेत शिवसेनेला सहकार्य केले. मात्र, हिच शिवसेना आता काँग्रेसची फसवणूक करते आहे.
संजय निरुपम यांनी ट्विटरवरून संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या कंपाउंडरला हेडलाइन बनवण्याची प्रचंड भूक लागली असून ही भूख अनेकांना संपवते. ही दुर्भावना नाही तर वास्तव आहे, अशा शब्दांत निरुपम यांनी घणाघात केला आहे.
फडणवीसांकडून भेटीचा उलगडा
संजय राऊत यांच्यासोबत झालेल्या भेटीवर स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. फडणवीस म्हणाले, ‘शिवेसेनेच्या सामना दैनिकासाठी माझी मुलाखत घेण्याची संजय राऊत यांची इच्छा आहे. याच मुलाखतीसंदर्भात आमची बैठक झाली. या मुलाखतीसंदर्भात मी त्यांनी काही अटी घातल्या होत्या. त्यासाठीच भेट झाली. बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. कुठलाही भाग न वगळता मुलाखत प्रसिद्ध करण्यात यावी, अशी अट मी त्यांना घातली होती,’ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘शिवसेनेसोबत कोणतीही चर्चा सुरू नाही. त्यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याची कोणतीही चर्चा बैठकीत केली नाही. त्यासाठी असे कोणतेही कारण नाही. जे सरकारचे काम सुरू आहे. त्यावर जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे. त्यामुळे हे सरकार आपल्या कृतीमुळे कोसळेल. ज्यावेळी हे सरकार पडेल त्यावेळी आम्ही बघू, पण सरकार बनवण्याची कोणतीही घाई भाजपाला नाही, असेही फडणवीस म्हणाले.
शरद पवार-उद्धव ठाकरेंची ‘वर्षा’वर चर्चा
दरम्यान, संजय राऊत आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर महाविकास आघाडीत घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात रविवारी दुपारी ‘वर्षा’वर बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे सुद्धा उपस्थितीत होते. तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झाली होती. या बैठकीविषयी कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नाही. पण कालच भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आहे.