स्थैर्य, नागठाणे, दि. २६: थकलेल्या विजबिलापोटी नागठाणे (ता.सातारा) येथील धान्याच्या सरकारी गोडाऊनचे वीज कनेक्शन नुकतेच महावीतरणकडुन तोडण्यात आले.या गोडाऊनमध्ये सध्या इलेक्ट्रॉनिक मतपेट्या मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत.मात्र बिल नेमके कोणी भरायचे? या जिल्हा पुरवठा शाखा व निवडणूक शाखा यांच्या समन्वया अभावी वीज नसल्याने गेल्या काही दिवसांपासून हे गोडाऊन काळोखाच्या साम्राज्यात आहे.यामुळे येथे पहारा करणार्या पोलीस कर्मचारी यांना अंधरातच आपली डयूटी बजवावी लागत आहे.
नागठाणे येथे जिल्हा पुरवठा शाखेचे प्रशस्त गोडाऊन आहे.या गोडाऊनचा वापर पूर्वी धान्य ठेवण्यासाठी केला जात होता.मात्र सध्या या गोदाऊनमध्ये इलेक्ट्रॉनिक मतपेट्या सुरक्षितरित्या ठेवण्यात आल्या आहेत.यासाठी या गोडाऊनच्या सुरक्षेसाठी चोवीस तास पोलीस बंदोबस्त ही आहे.गोडाऊनचे सुमारे 18 हजार रुपये इतके वीजबिल थकीत असल्याचे समजते.जिल्ह्यात सर्वत्र थकीत विजबिलांची वसुली महावितरणकडून सुरू आहे.या गोडाऊनच्या थकीत विजबिलांची मागणी महावितरणने जिल्हा पुरवठा शाखेकडे केली. मात्र जिल्हा पुरवठा शाखेने निवडणूक शाखेकडे बोट दाखविले.दोन्ही कार्यालयांकडून परस्परांकडे बोटे दाखविले गेल्यामुळे अखेर महावितरणने काही दिवसांपूर्वी या गोडाऊनचे विजकनेक्शन कट केले.त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हे गोडाऊन अंधारात आहे.व येथील मतपेट्याची सुरक्षाही धोक्यात आली आहे.अद्यापही हे थकलेले वीजबिल कोणी भरायचे? यावरून जिल्हा पुरवठा शाखा व निवडणूक शाखा यांच्यात टोलवाटोलवी सुरूच असल्याचे समजते.त्यामुळे हे गोडाऊन मात्र काळोखाच्या साम्राज्यात गेले आहे.