तब्बल १०० वर्षानंतर पुन्हा एका कीटक प्रजातीचा शोध


स्थैर्य, सातारा, दि. 30 : सातारा शहरातील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ् डॉ. श्रीराम भाकरे, मानद वन्यजीवरक्षक सुनील भोईटे व दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथील प्राणीशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. प्रतिमा पवार-भोईटे यांनी उरमोडी धरण पाणवठा क्षेत्रामध्ये एका अत्यंत दुर्मिळ व विलुप्त समजण्यात येणाऱ्या चतुर (ड्रॅगन/डॅमसेल फ्लाय) परिवारातील लेस्टेस पॅट्रिशिया या प्रजातीची तब्बल १०० वर्षानंतर नव्याने नोंद करण्यात यश मिळवले आहे. १९२२ साली या प्रजातीचा एकमेव नर कीटक कर्नाटक येथील कूर्ग परिसरात आढळला होता. तो नमुना सध्या लंडन येथील नॅचरल हिस्टरी म्युझियम येथे आहे.

जवळपास १०० वर्षे या प्रजातीचा पश्चिम घाटात शोध घेण्याचा अथक प्रयत्न अनेक संशोधक करीत होते. निसर्गाचा मानवनिर्मीत विनाश बघून कदाचित ही दुर्मिळ प्रजाती कायमची विलुप्त झाली असावी अशी चर्चा संशोधकांमध्ये दीर्घ काळ सुरु होती. परंतु या नवीन शोधामुळे त्याच्या अस्तित्वास पुष्टी मिळाली आहे. लंडन म्युझियममध्ये लेस्ट्स पॅट्रीशियाच्या नमुन्याशी ह्या नवीन नोंदविलेल्या उप-प्रजातीची तुलना करता त्याच्या शरीररचनेसह बाह्य अंगावरील ओळखणीच्या खुणा व वैशिष्ट्यांमध्ये मुख्यत्वेकरून फरक दिसून आला. त्यामुळे सदर प्रजाती ही सद्यस्थितीत लेस्ट्स पॅट्रीशियाचीच उपप्रजाती लेस्ट्स पॅट्रीशिया ताम्रपट्टी या नावाने नोंदविण्यात आलेली आहे. त्या संबंधीचा त्यांचा शोधनिबंध नुकताच बायो नोट्स या राष्ट्रीय व मान्यताप्राप्त नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाला आहे.

सातारा परिसरातील कीटकांच्या जैवविविधतेचा दीर्घकाळापासून अभ्यास करणारे डॉ. भाकरे, श्री/सौ. भोईटे यांनी या प्रजातीचा शोध लावल्यामुळे, सातारा परिसरातील सूक्ष्मजैव विविधतेचे महत्व तसेच त्याच्या संवर्धनाची आवश्यकता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. याबद्दल या अभ्यासकांचे देशभरातील संशोधकांनी, मान्यवर व सातारा परिसरातील निसर्ग प्रेमींनी अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या आजूबाजूस आढळणारे अशा प्रकारचे सूक्ष्मजीव, कीटक हे नेहमीच मानवास प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सहाय्यभूत असतात. यावर अधिक संशोधन होऊन त्यांच्या जतनासाठी चे प्रयत्न अधिक जोमाने करणे गरजेचे आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!