प्रवचने – प्रपंचाचे स्वरूप समजून घेऊन नामात राहावे


आपले जीवन किती अस्थिर आहे हे लढाईच्या काळात चांगले समजून येते. अशा अस्वस्थतेच्या काळात मनाने घाबरू नये. काळजी न करता शांत चित्ताने भगवन्नामांत कर्तव्य करीत राहावे. काळजीला म्हणा कारण असे काहीच लागत नाही, कारण ती आपल्या काळजापर्यंत, नव्हे काळजापाशीच असते. काळजी करायचीच म्हटले म्हणजे कोणत्याच गोष्टी तिच्यातून सुटत नाहीत. काळजीमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास होतो. ज्याला काळजी नाही त्याने भगवंत आपलासा करून घेतला हे समजावे. भगवंतावर पूर्ण विश्वास टाकून, तुम्ही काळजी करण्याचे एकदम बंद करा.

ज्याप्रमाणे कुणाचीही कुंडली मांडली, मग तो श्रीमंत असो की गरीब असो, तरी तिच्यामध्ये सर्व ग्रह यायचेच, त्याचप्रमाणे जन्मलेल्या प्रत्येक प्राण्याला सर्व विकार असायचेच. भगवंताचे अवतार जरी झाले किंवा साधुपुरूष जरी झाले तरी त्यांनाही विकार असतातच. अर्थात्‌ त्या विकारांच्या बरोबर प्रेम, दया, शांती, क्षमा, हे गुणही त्यांच्या अंगी असतात. ग्रह हे या जन्माचे आहेत, पण विकार हे मागच्या जन्मापासून असलेले असतात. या विकारांना वश न होता, म्हणजेच त्यांचे नियमन करून, गुणांचे संवर्धन करणे हे प्रपंचात मनुष्याला शिकायचे असते.

कुटुंबातल्या व्यवहारामध्ये प्रत्येक घटकाने आपापले स्थान ओळखून असावे. ज्याला स्वतःच्या मुलाबद्दल प्रेमामुळे इतकी खात्री असते की, आपण सांगितलेले आपला मुलगा केल्याशिवाय राहणार नाही, तो बाप खरा. ज्याला अशी उत्सुकता असते की, वडिलांनी आपल्याला सांगावे आणि आपण ते करावे, तो मुलगा खरा. बापाचा पैसा हा मुलाने अनीतीने वागण्यासाठी नाही. जो मुलगा अनीतिने वागतो, त्याला बापाने पैसा देऊ नये. ज्याप्रमाणे वर बसणाऱ्याची मांड पाहून घोडा दांडगाई करतो, त्याचप्रमाणे बापाचे पाणी ओळखूनच मुलगा वागतो. गृहिणीने स्वतः स्वयंपाक करून घरातल्या माणसांना जेवायला घालावे; त्या करण्यामध्ये प्रेम असते. प्रत्येक गृहिणीला घरामध्ये थोडे तरी काम पाहिजेच. खरोखर, विवाहामध्ये बंधने फार आहेत; कारण ती अत्यंत पवित्र गोष्ट आहे. जो मनुष्य तरूणपणी स्वाभाविक रीतीने आणि नीतिनियमानुसार वागेल त्याला म्हातारपण मुळीच दुःखदायक होणार नाही. आज ज्याने चांगले वागण्याचा निश्चय केला त्याचे मागले पुसलेच. भगवंत रोज संधी देतो आहे; आज सुधारले आणि कालचे पुनः केले नाही म्हणजे पूर्वीचे नाहीसे होते, हीच संधी.

जो शहाणा असेल त्याने समजून, व जो अडाणी असेल त्याने श्रद्धेने बंधने पाळावी.


Back to top button
Don`t copy text!