स्थैर्य, पाचगणी, दि. 30 : येथील बेल एअर हॉस्पिटलमधील कोविड सेंटरमधून 20 वर्षीय कोरोनाबाधित युवती पळून गेल्याने पाचगणीमध्ये खळबळ उडाली आहे.
बेल एअर हॉस्पिटल येथे काही दिवसांपूर्वी चेंबूर मुंबई येथून एचआयव्ही बाधित रुग्ण उपचारार्थ दाखल झाला होता. त्यावेळी त्याची कोरोना टेस्ट घेण्यात आली होती. ती टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. तसेच त्या रुग्णासोबत आलेल्या त्याच्या 20 वर्षीय मुलीमध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने तिची टेस्ट करण्यात आली होती. दि. 25 जून रोजी त्या मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तिला उपचारार्थ बेल एअर हॉस्पिटलमध्ये नव्याने सुरू करण्यात कोविड 19 सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. आज पहाटे पाचच्या सुमारास या युवतीने बेल एअर कोविड सेंटर मधून पलायन केल्याचे निदर्शनास आले असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. या निमित्ताने या रुग्णालयातील सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. हॉस्पिटलमध्ये सुरक्षा व्यवस्था असतानाही बाधित युवतीने पलायन केलेच कसे याबाबत नागरिकांमधून उलट सुलट चर्चा सुरू आहे. याला बेल एअर हॉस्पिटल प्रशासनाचा गलथानपणा जबाबदार असल्याचे बोलले जात असून बाधित युवती नक्की कोठे गेली याचा तपास होणे गरजेच बनले आहे. कोविड सेंटरमध्ये चार तालुक्यातील रुग्ण उपचार घेत असल्याने त्यांच्याही सुरक्षेचा प्रश्न या पलायनाने उपस्थित झाला आहे.