दैनिक स्थैर्य | दि. २१ मार्च २०२४ | फलटण |
ध्येय, चिकाटी ठेवून प्रयत्न केल्यास निश्चित यश मिळू शकते. ज्या क्षेत्रात आपणास करिअर करायचे आहे, त्या क्षेत्रामध्ये आपण उच्च स्तरावर असले पाहिजे, असे प्रतिपादन श्री सद्गुरू प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी केले.
श्री सद्गुरू प्रतिष्ठानच्या वतीने सुशिलादेवी लालासाहेब पाटणकर माध्यमिक विद्यालय व कर्नल अकॅडमी, वाजेगाव येथे यशवंत अभ्यासिकेसाठी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व इतर विविध भरती परीक्षांसाठी आवश्यक असणारी पुस्तके भेट देण्यात आली. या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भोसले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नल अकॅडमीचे संचालक जयवंतराव पाटणकर होते.
याप्रसंगी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ, सहकार महर्षी हणमंतराव पवार कुक्कुटपालन संस्थेचे व्हाईस चेअरमन मानाजीराव चव्हाण तसेच किशोर पाटणकर, भानुदास मतकर, श्री. पिसाळ, सुभेदार गरड, भरत जाधव, श्री. मुळीक, प्रशालेच्या मुख्याध्यापिका घाडगे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
दिलीपसिंह भोसले म्हणाले की, कर्नल अकॅडमीला आपले सर्वतोपरी सहकार्य भविष्यातही राहील. पुढील काळात संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी संगणक तसेच इतर सुखसुविधा देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू.
ज्येष्ठ पत्रकार बेडकिहाळ म्हणाले, देशाची सीमा संरक्षित करण्याचे काम जवान करत असतात, म्हणूनच आपण सर्वजण सुरक्षित आहोत. सीमेचे रक्षण करण्यासाठी आपलेही हात उपयोगी पडावेत, हेच आपले स्वप्न असावे.
श्री. पाटणकर म्हणाले, शारीरिक, मानसिक, बौद्धिकदृष्ट्या विद्यार्थी सक्षम व भविष्यात त्यांच्या हातून देशाची सेवा घडावी, या उदात्त हेतूने आपण या संस्थेची स्थापना केलेली आहे.
श्री. बोबडे सर यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमास विद्यार्थी, ग्रामस्थ, संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.